loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्‍वर फुणगूस येथील प्रसिद्ध दर्गा शेख जाहिर पिरबाबांचा उर्स मुबारक १ फेब्रुवारी २०२६ पासून सुरु होणार

रत्नागिरी (आर.वाय.पारेख) - संगमेश्‍वर तालुक्यातील खाडी किनारी वसलेल्या फुणगूस येथील सुप्रसिद्ध सुफी संत हजरत शेख जाहिर शेख बाबा पिर यांचा उर्स मुबारक दि. १ फेब्रुवारी २०२६ रविवार पासून पारंपारीक पद्धतीने व मोठ्या धार्मिक भावनेने साजरा करण्यात येणार आहे. या उर्स निमित्त रत्नागिरी जिल्हा व इतरत्र बाहेरुन मोठ्या प्रमाणांत बाबांच्या भक्तांची उपस्थिती असते. चार दिवसीय ऊर्स सोहळ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सध्या ऊस निमित्त ग्रामस्थ मंडळी व गादी नशिन मुसब्बीर मुजावर यांच्या देखरेखेखाली जय्यत तयारी सुरु आहे. येणार्‍या बाबांच्या भक्तांना कसल्याही प्रकारचा त्रास होवू नये म्हणून काळजी घेण्यात येत आहे. पूर्वीचे दर्गाचे गादी नशीन मुजावर नासिर मुजावर यांच्या निधनानंतर त्यांचे मुलगे मुसब्बीर नासिर मुजावर हे सध्या दर्गाची देखभाल करत असून त्यांचे काका नुरा मुजावर व ग्रामस्थ मित्र मंडळी ऊर्स च्या कामात मग्न झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

फक्त कोकणांतच नव्हे, महाराष्ट व गोवा राज्यात देखील नावलौकिक असलेला हजरत शेख जाहिर शेख पिर बाबा हा दर्गा संगमेश्‍वर तालुक्यातील फुणगूस येथे शास्त्री खाडीच्या काठावर उभा आहे.सर्वात सुंदर तसेच तितकाच आकर्षक असलेल्या या दर्ग्यात केलेले काचेचे कोरीव काम भाविकांसह पर्यटकांनाही आकर्षित करत आहे. नवसाला पावणारा जागृत दर्गा म्हणून देखील या दर्ग्याची वेगळी ओळख आहे. त्यामुळे वर्षाकाठी हजारो भाविक व पर्यटक येथे भेट देत असतात. गुरुवार तसेच रविवारी तर भाविकांची येथे अक्षरशः रांग लागलेली असते. फक्त् कोकणांतूनच नव्हे, तर संपूर्ण राज्यातून देखिल भाविक येथे येत असतात. त्यामुळे या दर्ग्याच्या वार्षिक ऊर्स मुबारक ची सर्वांना प्रतिक्षा असते. येथील वार्षिक ऊर्स मुबारक इस्लामी कॅलेंडर नुसार शाबान महिन्यांच्या १२ तारखेपासून सुरु होतो. तर ऊर्स चा मुख्य कार्यक्रम १४ शाबान रोजी साजरा करण्यात येतो. त्याच दिवशी मुस्लीम बांधवांची शब्बे बरात ही मोठी पवित्र रात्र देखील असते. त्यामुळे या ऊर्स उत्सवाला एक वेगळे महत्व देखील आहे. यावर्षी १ फेब्रुवारी पासून ऊर्स उत्सवाला सुरुवात होणार असून त्या दिवशी संध्याकाळी चूना मुबारक ची मिरवणूक निघणार आहे. तसेच सोमवार दि. २ फेब्रुवारी रोजी दुपारी दर्गा व्यवस्थापक नुरमहंमद मुजावर व मुस्सबीर मुजावर यांच्या निवासस्थानापासून संदल मुबारक ची मिरवणूक निघेल. संपूर्ण मोहल्ला व बाजार पेठ मार्गे दर्गे मध्ये मिरवणूकीची सांगता होईल.

टाइम्स स्पेशल

सोमवारी रात्री दर्गा पटांगणांत नुराणी रातीब हा मुख्य कार्यक्रम व दर्गेचे एक खास आकर्षण कार्यक्रम पार पडणार आहे. मुसब्बीर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली नुराणी रातीब चे तरुण हा कार्यक्रम सादर करणार आहेत. तर मंगळवार दि.३ फेब्रुवारी रोजी ऊर्स मुबारक पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. बुधवार दि. ४ फेब्रुवारी रोजी ‘नियाज’(कंदोरी) ने चार दिवसीय ऊर्स मुबारक उत्सवाची सांगता होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन दर्गा व्यवस्थापक नुरमहंमद मुजावर व मुसब्बीर मुजावर यांनी केले आहे. या दर्गेचा लौकीक व प्रसिद्धी फार मोठी असून चोख बंदोबस्त ठेवण्याची तयारी सुरु केली असून शांततेत ऊर्स पार पाडण्यांसाठी सर्वोतोपरी मदत करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg