loader
Breaking News
Breaking News
Foto

नवोदयच्या विद्यार्थ्यांना निसर्ग चित्राचे प्रात्यक्षिक, विद्यार्थ्यांनी साकारल्या कलाकृती

संगमेश्वर (प्रतिनिधी) - कलाकार ज्यावेळी रंगपटलावर आपल्या कुंचल्याच्या माध्यमातून सर्वस्व पणाला लावतो, त्यावेळी उत्तमोत्तम कलाकृतींची निर्मिती होते. उत्तम कलाकृती साकारण्यासाठी आवश्यक असते, ती सजग दृष्टी आणि सातत्यपूर्ण सराव. जलरंग हाताळणं अवघड असलं तरीही सरावाने त्यावर प्रभुत्व मिळवता येते यासाठी कलाकाराने सातत्यपूर्ण सरावावर भर द्यावा, असं आवाहन ख्यातनाम जलरंग निसर्ग चित्रकार विष्णू परीट यांनी केले. राजापूर तालुक्यातील पडवे येथील जवाहर नवोदय विद्यालयातील कलेची आवड असणाऱ्या इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची वार्षिक सहल सावर्डे येथील सह्याद्री कला महाविद्यालयाने आयोजित केलेल्या वार्षिक कला प्रदर्शनाला भेट देण्यासाठी आली होती. यावेळी या विद्यार्थ्यांनी व्यापारी पैसा फंड संस्थेच्या पैसा फंड कलादालन आणि कला वर्गाला देखील भेट दिली. यावेळी संगमेश्वर येथील जाखमाता मंदिर परिसरात सोनवडे येथील ख्यातनाम जलरंग चित्रकार विष्णू परीट यांच्या निसर्ग चित्राच्या प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विष्णू परीट हे बोलत होते. यावेळी जैतापूर हायस्कूलचे उपक्रमशील कलाशिक्षक कुणकवळेकर, नवोदय विद्यालयाचे कलाशिक्षक उन्मेश वेलिंगकर, क्रीडा शिक्षक साहिल यादव, सहशिक्षिका श्रीयांका बोर्डीकर, आदिती वाघधरे आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विद्यार्थ्यांनी रेखाटनासाठी ठिकाण निवडताना कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत, याविषयी विष्णू परीट यांनी महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. चित्र रेखाटनासाठी कोणता कागद वापरावा, प्रत्येक कागदाचा पोत कसा असतो, चित्र रेखाटताना पेन्सिल वर किती दाब द्यावा, रेखाटन कशा प्रकारे करावे ? याविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना विष्णू परीट यांनी सखोल मार्गदर्शन केले. जलरंगात निसर्ग चित्र रेखाटत असताना टप्प्याटप्प्याने रंगांचा गडद पणा कसा वाढवावा, याबरोबरच रंग ओले राहावे यासाठी काय करावे ? याचे प्रात्यक्षिक परीट यांनी सादर केले. निसर्ग चित्रात रंगांचा ताजेपणा आणि टवटवीतपणा टिकवणे सर्वाधिक महत्त्वाचे असते. यासाठी काही वेळाने पाणी बदलावे, कुंचला स्वच्छ साफ करावा अशा विविध बारीक-सारीक गोष्टींची काळजी घेणे किती महत्त्वाचे असते ? याविषयी विष्णू परीट यांनी सखोल विवेचन केले. नवोदय विद्यालयातील कलेची आवड असणाऱ्या इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी प्रात्यक्षिका दरम्यान उपस्थित केलेल्या शंकांना चित्रकार विष्णू परीट यांनी अत्यंत समाधानकारक उत्तरे देऊन विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. केवळ दीड तासात परीट यांनी संगमेश्वर येथील जाखमाना मंदिर परिसरात एक उत्कृष्ट कलाकृतीचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांसमोर सादर केले. कलाकृती पूर्ण होतात उपस्थित विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून अप्रतिम अशा साकारलेल्या परीट यांच्या निसर्ग कलाकृतीचे स्वागत आणि अभिनंदन केले.

टाइम्स स्पेशल

विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असे निसर्गचित्राचे प्रात्यक्षिक दाखवून त्यांच्या शंकांचे निरसन केल्याबद्दल नवोदय विद्यालयाचे कलाशिक्षक उन्मेश वेलिंगकर, क्रीडा शिक्षक साहिल यादव, जैतापूर हायस्कूलचे उपक्रमशील कलाशिक्षक कुणकवळेकर आदींनी निसर्ग चित्रकार विष्णु परीट यांना धन्यवाद दिले. यानंतर विद्यार्थ्यांनी सह्याद्री कला महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनाला भेट देऊन तेथील कलाकृतींचा आस्वाद घेतला. सह्याद्री कला महाविद्यालयातील कलादालन आणि संपूर्ण परिसर पाहून विद्यार्थी भारावून गेले. सह्याद्री कला महाविद्यालयाचे चेअरमन प्रकाश राजेशीर्के, प्राचार्य माणिक यादव आणि प्राध्यापक यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून कलाकृती विषयी अधिक माहिती दिली. परतीच्या प्रवासात नवोदय विद्यालयाच्या सर्व विद्यार्थ्यांनी संगमेश्वर जाखमाता मंदिर परिसरात निसर्गदृश्याचे अप्रतिम रेखाटन करत ८० कलाकृती साकारल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg