loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यात ५ फेब्रुवारीपर्यंत प्रतिबंधात्मक मनाई आदेश

रत्नागिरी, दि. 27 (जिमाका) : जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी 22 जानेवारी 2026 रोजी 00.01 वाजल्यापासून ते 5 फेब्रुवारी 2026 रोजी 24 वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) सन 1951 चा कायदा 22 वा प्रमाणे प्रतिबंधात्मक मनाई आदेश अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी दिला आहे. जिल्ह्याचे कार्यक्षेत्रामध्ये आगामी काळात सण, उत्सव साजरे करण्यात येणार आहेत. तसेच विविध राजकीय पक्ष व संघटनातर्फे त्यांच्या निरनिराळ्या मागण्यांच्या तसेच विषया संदर्भात खालील नमुद प्रमाणे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 22 जानेवारी ते 29 जानेवारी 2026 माघी गणेशोत्सव, दि. 23 जानेवारी रोजही संत तुकाराम महाराज जयंती, 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन, 29 जानेवारी रोजी जया एकादशी, 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी पुण्यतिधी, 31 जानेवारी रोजी विश्वकर्मा जयंती, 5 फेब्रुवारी रोजी संकष्ट चतुर्थी साजरी करण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, अलोरे-शिरगांव, रत्नागिरी, जयगड तसेच देवरुख या ठिकाणी, मोठ्या प्रमाणावर औद्योगिक कारखाने असून अलोरे-शिरगांव पोलीस ठाणे हद्दीत साफयीस्ट कंपनी, खेड. येथील कोकोकोला कंपनी, जयगड येथील वाटद खंडाळा प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पाचे अनुषंगाने स्थानिकांकडून आपल्या विविध मागण्यासाठी अचानक संप व आंदोलन पुकारण्यात येत असतात. तसेच रत्नागिरी जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरीकांकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग मुंबई-गोवा क्र. ६६ चे काम पूर्ण न झाल्याचे निषेधार्य आंदोलनात्मक कार्यक्रम करण्यात येत आहेत. अशावेळी आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यामध्ये बहुतांशी गावांमध्ये हिंदु-मुस्लिम बौध्द तसेच इतर धर्मियांची मिश्रवस्ती असल्याने काही वैयक्तीक कारणांमुळे जातीय तणावाच्या घटना घडून दखलपात्र व अदखलपात्र गुन्हे घडून त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू शकते. तसेच सध्या ओबीसी व मराठा आरक्षणावरुन दोन समाजांमध्ये तेड निर्माण झालेले असून त्यावरून आंदोलनात्मक कार्यक्रम करण्याची शक्यता नाकारता येत नाही. दि. 13 जानेवारी रोजी पासून जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. दि. 5 फेब्रुवारी रोजी मतदान व दि. 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुक प्रचारादरम्यान राजकीय पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करणे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिका-टिपण्णी करणे यामुळे राजकीय तणाव निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होवू शकते. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे आवश्यक असल्याने मनाई आदेश जारी करण्यात आला आहेत.

टाइम्स स्पेशल

शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल, अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांमध्ये प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे. अंत्ययात्रा, धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी बाबींना प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाहीत. प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणलाही मोर्चा, मिरवणुका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg