देवळे (प्रकाश चाळके) - संपूर्ण राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणार्या स्वयंभू श्री देव मार्लेश्वर तीर्थक्षेत्राला (शिखर) वार्षिक यात्रौत्सवाचे वेध लागले आहेत. यावर्षी हा यात्रौत्सव दि. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत साजरा होत आहे. तर राज्यात सुप्रसिद्ध असणारा मार्लेश्वर- गिरीजादेवीचा विवाहसोहळा (कल्याणविधी) दि. १४ जानेवारीला संपन्न होणार आहे. १३ जानेवारीला भोगिच्या दिवशी मार्लेश्वर गुहेकडे मोठी गर्दी होते. मकरसंक्रांतीच्या या वार्षिक यात्रौत्सवाकडे तमाम मार्लेश्वर भाविकांचे आत्तापासूनच लक्ष लागून राहीले आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख शहरापासून अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या कडेकपारीत, सभोवताली उंचच उंच ताशीव कडे, हिरव्यागार वनराईत, वानर सेना, पक्षांचा किलबिलाट, नागमोडी वळण घेत जाणारी पायरयांची वाट, शिवहराचा गजर अशा निसर्गरम्य ठिकाणी एका गुहेमध्ये स्वयंभू श्रीदेव मार्लेश्वर देवस्थान वसले आहे.
देवस्थानच्या समोरच बारमाही वाहणारा धारेश्वर धबधबा आहे. हा धबधबा मार्लेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकाच्या मनाला भुरळ घालत असतो तर गुहेमध्ये सापांचा वावर असतो मात्र आजपर्यंत एकाही भाविकाला सापाकडून इजा झाल्याचे ऐकिवात नाही. श्री देव मार्लेश्वराचे देवस्थान निसर्गरम्य ठिकाणी वसले असल्याने दररोज हजारो भाविक मार्लेश्वरच्या दर्शनासाठी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री येत असतात. तसेच येथील निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठीही दाखल होत असतात. राज्य शासनाने मार्लेश्वर तीर्थक्षेत्र ’क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून घोषित केले आहे. स्वयंभू मार्लेश्वर देवस्थानची महती सर्वदूर पसरली आहे. त्यामुळे मार्लेश्वराच्या भाविकांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असते. स्वयंभू मार्लेश्वराचे देवस्थान हे अठराव्या शतकातील असून देवस्थानचे मूळ शंकराचे शिवलिंग हे देवरुख शहरापासून केवळ ३ किमी अंतरावर असणार्या मुरादपूर गावी होते. परंतु तेथील अत्याचाराला कंटाळून शिवलिंगरुपी सत्पुरूषाने जिथे मनुष्यवस्ती नाही व जिथे कोणताही भ्रष्टाचार नाही अशा शांत ठिकाणी जायचे ठरवले व श्रीदेव मार्लेश्वर हे आंगवली मठात (पूर्वीचे) आले. त्यानंतर ते सह्याद्रीच्या कपारीत असणार्या एका गुहेत जाऊन राहिले. अशी आख्यायिका प्रसिद्ध आहे.
त्यामुळे आजही आंगवली मठाला (आताचे मार्लेश्वर देवालय) अनन्यसाधारण महत्त्व आहे. मार्लेश्वराच्या वार्षिक यात्रेचा प्रारंभ प्रथेप्रमाणे याच मठातून होत असतो. हा वार्षिक यात्रौत्सव यावर्षी दि. ११ ते १७ जानेवारी या कालावधीत साजरा होणार आहे. यामध्ये दि. ११ रोजी आंगवली मार्लेश्वर देवालय येथे मार्लेश्वर देवाचा मांडव घालणे, दि. १२ रोजी मार्लेश्वर देवाला हळद लावणे व घाणा भरणे दि. १३ रोजी आंगवली मार्लेश्वर देवालय येथे यात्रा व रात्री १२ वा. मार्लेश्वर पालखीचे शिखराकडे प्रयाण दि. १४ रोजी श्री देव मार्लेश्वर व साखरप्याची गिरिजादेवी यांचा मार्लेश्वर तीर्थक्षेत्री विवाहसोहळा दि. १५ रोजी मारळ येथे मार्लेश्वराची वार्षिक यात्रा, दि. १६ रोजी आंगवली गावात मार्लेश्वर पालखीचे घरोघरी दर्शन व दि. १७ रोजी घरभरणीने या वार्षिक यात्रौत्सवाची सांगता होणार आहे. दरम्यान, यात्रौत्सव काळात देवरुख आगारातून जादा बसेस सोडून भाविकांची अतिशय चांगल्याप्रकारे सोय केली जाते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मार्लेश्वर तीर्थक्षेत्री देवरुख पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो.

























































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.