loader
Breaking News
Breaking News
Foto

शहरात श्वास कोंडतोय, पण कोकण समृद्ध होतोय; अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी वेत्ये येथे व्यक्त केला विश्वास

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - शहरांकडे स्थलांतर करणारा तरुण आता आपल्या गावातच राहून शिक्षण आणि अर्थार्जन करेल, असा विश्वास 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री रसिका वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये ग्रामपंचायतीला दिलेल्या भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. वेत्ये गावात रसिका वेंगुर्लेकर आणि अभिनेता पृथ्वीक प्रताप यांचे वाजतगाजत स्वागत करण्यात आले. महिलांनी डोक्यावर कलश घेऊन, वारकरी पथक, लेझीम आणि ढोल-ताशांच्या गजरात सेलिब्रिटींची भव्य मिरवणूक काढली. दीपप्रज्वलन आणि वृक्षाला पाणी घालून या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. शासनाच्या 'सेलिब्रिटींची भेट' या उपक्रमाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आपल्या भावना व्यक्त करताना रसिका वेंगुर्लेकर म्हणाल्या, "शहरात आज श्वास घ्यायला ऑक्सिजन उरलेला नाही. तिथे प्रदूषण आहे की धुकं, हेच समजत नाही. याउलट सिंधुदुर्गातील गावे स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त आहेत. मध्यंतरी रोजगारासाठी तरुण शहराकडे वळला होता, पण आता गावे समृद्ध होत असल्याने हा तरुण पुन्हा गावाकडे परतेल. कोकणातील मातीतील खरेपणा जगात कुठेच मिळणार नाही. निवृत्तीनंतर मी स्वतः सिंधुदुर्गातच स्थायिक होण्याचा मनोदय ठेवला आहे." अभिनेता पृथ्वीक प्रताप यांनी वेत्ये गावातील विकासकामांचे कौतुक केले. ते म्हणाले, "वेत्ये गाव तंटामुक्त होऊन प्रगतीकडे वाटचाल करत आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी बदल स्वीकारू नका, तर आयुष्यभर प्रगतीपथावर नेणारे शाश्वत बदल स्वीकारा."

टाईम्स स्पेशल

मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी सांगितले की, सिंधुदुर्गात पर्यटकांची संख्या तिपटीने वाढली असून जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलत आहे. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड-कबुतरे यांनीही आपले विचार मांडले. गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी प्रास्ताविकात वेत्ये गाव जिल्ह्यासाठी 'रोड मॉडेल' ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाला सरपंच गुणाजी गावडे, माजी सभापती रमेश गावकर, उपसरपंच महेश गावडे, ग्रामविकास अधिकारी स्वाती कदम-काकतकर, माजी सरपंच सुनील गावडे, स्नेहा मिठबावकर, उप पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, राजेंद्र आंबेकर, नंदिनी निगुडकर, तन्वी गावकर, जितेंद्र गावकर, तंटामुक्ती अध्यक्ष गुरुदास गावकर, पोलिस पाटील रमेश जाधव, नरेंद्र मिठबावकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सरपंच गुणाजी गावडे यांनी मान्यवरांचे स्वागत, सत्कार व आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg