loader
Breaking News
Breaking News
Foto

गुजरातहून चिपळूणला जाणारा अवैध खैराचा ट्रक वनविभागाच्या जाळ्यात; पोलादपूरमध्ये मोठी कारवाई

पोलादपूर (इक्बाल जमादार ) - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर पोलादपूर जवळ वनविभागाच्या पथकाने सापळा रचून गुजरात राज्यातून चिपळूणकडे होणारी अवैध खैराची तस्करी रोखली आहे. या कारवाईत अवैध खैराचा साठा असलेला ट्रक आणि त्याला रस्ता दाखवणारा दुचाकीस्वार अशा दोघांना पकडण्यात वनविभागाच्या महाड पथकाला यश आले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावरुन MH-12-EQ-9866 क्रमांकाचा ट्रक संशयास्पद रित्या जात असल्याचे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. या ट्रकच्या पुढे त्याला रस्ता दाखवण्यासाठी MH-03-DQ-6109 क्रमांकाची यामाहा FZ मोटारसायकल पथदर्शक म्हणून चालत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. वनविभागाने तत्काळ कारवाई करत मोहम्मद अरसद (राहणार गुलशन नगर, जिल्हा बलसाड, गुजरात) आणि मोहम्मद उस्मान नृद्दिन खान (राहणार मुलुंड कॉलनी, मुंबई) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या कारवाईत खैर वृक्षाचे 201 तुकडे जप्त करण्यात आले असून त्याचे मोजमाप अंदाजे 4.573 घनमीटर आहे. जप्त केलेल्या या मालाची बाजारभावाप्रमाणे किंमत 7,01,866 रुपये इतकी असून यासह ट्रक व दुचाकी ही दोन्ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणी भारतीय वन अधिनियम 1927 च्या कलम 26 (1), 41, 42 आणि 65 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना महाड न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. प्राथमिक तपासात असा संशय व्यक्त केला जात आहे की, हा ट्रक गुजरात राज्यातून येत असताना मूळ चालकाला चिपळूणचा रस्ता माहित नसल्यामुळे त्याला पनवेल येथे उतरवण्यात आले आणि तिथून पुढे दुसरा चालक वाहनावर बसवण्यात आला. मात्र, हा खैराचा साठा चिपळूणमध्ये नेमका कोणाला दिला जाणार होता आणि तो कोठे खाली होणार होता, याबाबतचा अधिक तपास वनविभाग करत आहे. ही यशस्वी मोहीम उपवन संरक्षक रोहा व सहाय्यक संरक्षक (जकास व कॅम्प) रोहा यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल आशिष पाटील, पोलादपूरचे वनपाल आणि पोलादपूर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg