loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्ह्यातील शेती बदलत्या पर्यावरणामुळे संकटात; शेतकऱ्यांसाठी भारतीय किसान संघ आक्रमक

दापोली, (वार्ताहर) : शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय किसान संघ रचनात्मक काम, संघटन आणि संघर्ष या त्रिसूत्रीच्या आधारे कार्यरत असून जैवविविधतेने नटलेल्या शेतीप्रधान रत्नागिरी जिल्ह्यात बदलत्या पर्यावरणामुळे शेती आणि शेतकरी दोघांचीही स्थिती चिंताजनक बनली असल्याचे प्रतिपादन भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विशाल चंद्रकार यांनी केले. कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या स्वामीनाथन सभागृह येथे दिनांक आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मनुष्यबळाची तीव्र कमतरता, पावसाची अनियमितता, वन्य प्राण्यांचा वाढलेला उपद्रव यामुळे शेतकरी शेती सोडून शहराकडे वळत असल्याची गंभीर स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय किसान संघ ही देशातील सर्वात मोठी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेत कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. चंद्रकार पुढे म्हणाले, भारतीय किसान संघ ही केवळ आंदोलन करणारी संघटना नसून शेतकऱ्यांचे हित कसे साध्य होईल यासाठी शासनाला योग्य ती साथ देणारी संघटना आहे. शासनाच्या खांद्याला खांदा लावून शेतकऱ्यांचे हित साधणे हा आमचा उद्देश आहे. सेंद्रिय शेतीला प्राधान्य देणे हे आमचे मुख्य ध्येय असून केमिकल कंपन्यांना दिले जाणारे अनुदान थेट शेतकऱ्यांना देण्यात यावे, अशी आमची ठाम मागणी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील पिकांच्या गरजेनुसार शेती अवजारांचा विविध शासकीय योजनांमध्ये समावेश व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता नारळ, सुपारी बागायतीसाठी सौर पंप उपयुक्त ठरत नसल्याने कृषी वीज जोडणी देण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालय, सचिवालय मुंबई येथे करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय किसान संघाने केलेल्या कार्याचा आढावा जिल्हा मंत्री धनंजय जोशी यांनी घेतला. शेतकऱ्यांचा दैनंदिन खर्च भागवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला २५ हजार रुपये देण्याची देशपातळीवरील मागणी भारतीय किसान संघाने केली होती. त्यातूनच शेतकरी सन्माननिधी योजना शासनाने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील म्हणाले, पर्जन्य मापन अचूक पद्धतीने होण्यासाठी प्रत्येक गावात पर्जन्यमापक बसविण्याची मागणी अधिवेशनात मान्य करण्यात आली आहे. याचा थेट लाभ पीकविमा वितरण प्रक्रियेत होणार आहे. तसेच जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीनुसार आंबा, भात व इतर पिकांसाठी पीकविमा योजना, तसेच शेतकऱ्यांना हवामानाबाबत अचूक माहिती मिळावी यासाठी हवामान केंद्रांच्या उभारणीची मागणी करण्यात आली असून त्याचा सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

खालील मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली. 1. पडीक जमीन लागवड प्रोत्साहन योजना 2. शेती व शेतीतील कामांना प्रतिष्ठा मिळण्यासाठी व मजुरांची समस्या सोडवण्यासाठी कार्पोरेट कंपनी प्रमाणे enrollment आणि निश्चित रोजगाराची हमी 3. शासकीय योजना राबवताना व धोरण कोकणासाठी स्वतंत्र निकष 4. वन्यप्राणी समस्येवर उपाययोजना करण्यासाठी वन, कृषी, गृह आणि वित्त खात्याची एकत्रित समन्वय बैठक 5. सौर कृषी पंप योजनेतील लाखो शेतकऱ्यांच्या डिपॉझिट वर 7% व्याज द्यावे, अन्यथा लवकरात लवकर सोलर पंप द्यावेत 6. सुपारी, शिंदी, मोह, काजू बोंड यांच्यासाठी योजना, धोरण तयार व्हावे आणि मूल्यासाखळी विकसित करावी. भारतीय किसान संघ हा शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी कायमच आग्रही राहिला असून रत्नागिरी जिल्ह्यातील वन्य प्राण्यांचा उपद्रव, वीज जोडणी, सिंचन आदी प्रश्नांसाठी वेळ पडल्यास मोर्चा, धरणे, आंदोलन यांसारख्या संघर्षाच्या मार्गावर जाण्यास संघटना सदैव तयार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. या पत्रकार परिषदेला भारतीय किसान संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विशाल चंद्रकार, महाराष्ट्र प्रांत संघटन मंत्री चंदन पाटील, रत्नागिरी जिल्हा मंत्री धनंजय जोशी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

दापोली येथे घेतली पत्रकार परिषद

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg