मुंबई :- ‘‘कोणत्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे तर मग आधी वेगळे का झालात हे सांगा...’’ असा रोखठोक सवाल करत उप मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी ठाकरे बंधूंनी केलेल्या प्रत्येक आरोपाला जशास तसे उत्तर दिले. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची नक्कल करणार्यांना उत्तर देताना ‘नक्कल करणार्यांची अवस्था काय होते हे काहीजणांना माहित नाही’ असे सुनावले. त्याचवेळी राज ठाकरेंप्रमाणे व्हिडीओ लावत चोख उत्तर दिले. मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी महायुतीची जाहीर प्रचार सभा सोमवारी सायंकाळी दादर येथील शिवाजी पार्क येथील मैदानावर झाली. यावेळी महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उप मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते ना. एकनाथ शिंदे तसेच भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांच्यासह महाराष्ट्र मंत्रिमंडळातील अनेक मंत्री, महायुतीचे उमेदवार आणि महायुतीचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. रविवारी याच मैदानावर ठाकरे बंधूंची जाहीर सभा झाली होती. दोन्ही ठाकरे बंधूंनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली होती. स्वाभाविकपणे सोमवारी झालेल्या महायुतीच्या जाहीर सभेत ठाकरेंच्या टीकेला उत्तर देण्यात आले. ठाकरेंचे नाव न घेता जोरदार टोलेबाजी करण्यात आली.
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, काल काही जणांना मराठी माणसाची आठवण झाली. त्यांनी मोठी टीका केली. ती ते करणारच होते. त्याचे मला आश्चर्य वाटले नाही ना तुम्हाला. आता सवय झाली. त्यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाचे उत्तर मी कधीच आरोपाने दिले नाही तर कामाने उत्तर दिले असे सांगत शिंदेंनी केलेल्या कामांची यादी वाचली. निवडणुका आल्या की याना पॉलिटिक्स आठवते, दिवसभर नेटफ्लिक्स आणि निवडणुका आल्या की पॉलिटिक्स हे त्यांना कळतं. मराठी माणसाची ही आठवण होते. परंतु सत्ता असताना तुम्ही मराठी माणसासाठी काय केलेत? साधे गिरणी कामगाराला घर देऊ शकला नाहीत. मुंबईतील मराठी माणूस मुंबईच्या बाहेर तुमच्यामुळे पडला. पार अंबरनाथ, बदलापूर पर्यंत गेला. हे पाप तुमचेच. आम्ही वेगवेगळे प्रकल्प राबवत आहोत. म्हाडाच्या माध्यमातून घरे देत आहोत. मुंबईच्या बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतो आहोत. मेट्रो आम्ही केली, कोस्टल रोड आम्ही केला. या सर्व कामांना तुमचे सरकार असताना स्टे दिला होता. गेल्या ३ वर्षांत मी आणि देवेंद्रजींनी तुम्ही दिलेल्या कामांवरील स्टे उठवला आणि कामाला गती दिली. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही असा जोरदार टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला.
यावेळी मुख्यमंत्री ना. देवेेंद्र फडणवीस यांचेही घणाघाती भाषण झाले. त्यांची रविवारच्या सभेत आदित्य ठाकरेंनी नक्कल केली होती. नक्कल करणार्यांची अवस्था काय होते हे काहींना माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला. रविवारच्या सभेत राज ठाकरेंनी व्हिडीओ लावत आरोप केले होते. फडणवीसांनी देखील राज आणि उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर कशी टीका केली होती याचे व्हिडीओ दाखविले. दुसर्याची लेकरं स्वत:च्या मांडीवर खेळवता अशी टीका तुम्ही करता. खरं तर लाज वाटायला हवी. तुम्ही माझ्या आईवडिलांवर बोललात. मी तुमच्या कुटुंबावर टीका करणार नाही कारण माझ्यावर संस्कार आहेत. माझं ठीक आहे, परंतु तुमचे वडील स्वर्गातून बघत असतील तेव्हा काय म्हणत असतील? रशीद मामुला सोबत घेत आहात, बाळासाहेबांच्या आत्म्याला काय वाटत असेल? असा सवाल करत फडणवीसांनी ठाकरे बंधूंवर पलटवार केला. मुंबई आणि मराठी माणसांचे नातं सांगता. हो, मुंबई मराठी माणसाची आहेच मात्र संपूर्ण भारताची आर्थिक राजधानी आहे. मुंबईचा मराठी माणूस स्वाभिमानी आहे आणि मुख्य म्हणजे मुंबईतील मराठी माणूस म्हणजे केवळ तुम्ही नव्हे. आम्हीही मराठी आहोत असे सांगताना मुंबईचा आगामी महापौर हा हिंदू मराठीच होईल असे त्यांनी ठणकावून सांगितले. मुंबईच्या गतीमान प्रगतीसाठी पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन फडणवीसांनी शेवटी केले.


















































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.