loader
Breaking News
Breaking News
Foto

वाटद शौचालय भ्रष्टाचार प्रकरणी तिरडी आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी - वाटदमिरवणे येथील शौचालय अनुदान व दस्तऐवजामध्ये फेरफार झाल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंद होत नसल्याकारणामुळे व रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ज्वलंत प्रश्नांवर प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघ, महाराष्ट्र राज्य (रत्नागिरी जिल्हा) यांच्यावतीने तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कारवाई न झाल्यास २६ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तिरडी आंदोलन व उपोषण करण्यात येणार असल्याची माहिती आरटीआयकार्यकर्ता निलेश रहाटे यांनी दिली. या पार्श्वभूमीवर महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी रत्नागिरीतील विविध शासकीय कार्यालयांना भेट देऊन निवेदने सादर केली. वाटद शौचालय भ्रष्टाचार प्रकरणात तब्बल ४१ महिने मंत्रालय, जिल्हा व तालुका स्तरावर पाठपुरावा करूनही प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्याने प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपजिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्याशी राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर व चिपळूण तालुक्यांतील विविध गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदही रानडे यांच्याशी सविस्तर बैठक घेऊन अनेक तक्रारी सादर करण्यात आल्या. यामध्ये जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचार, क्षमतेपेक्षा अधिक कामे एकाच ठेकेदाराला देणे, देवरूख नगरपंचायतीच्या नूतन इमारतीच्या कामांची चौकशी, घनकचरा प्रकल्पातील नियमबाह्य जाहिराती, गवाणे (लांजा) येथील रस्त्यांची निकृष्ट कामे, दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, संगमेश्वर तालुक्यातील अवैध वाळू उपसा व वाहतूक आदी मुद्द्यांचा समावेश होता. तसेच रस्त्यांवरील डांबर घोटाळे, नगरपंचायतीच्या इमारती, घनकचरा प्रकल्पासाठी जमीन खरेदीतील गैरप्रकार, उत्पादन शुल्क व अन्न व औषध प्रशासन विभागातील अवैध धंदे, अनधिकृत प्रखर लाईटबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी न होणे, ग्रामपंचायती बंद असणे, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नसणे, अधिकारी गैरहजर राहणे, माहिती अधिकार कायद्यातील कलम ०४ ची अंमलबजावणी न होणे, महिला लोकप्रतिनिधी असताना पती किंवा नातेवाईकांकडून हस्तक्षेप अशा गंभीर तक्रारी मांडण्यात आल्या.

टाइम्स स्पेशल

देवधामापूर पाष्टेवाडी येथील धोकादायक सार्वजनिक विहिरीची दुरुस्ती, तसेच राहुल जंगली यांच्यावर सन २०२३ पासून कर आकारणी न झाल्याचा मुद्दा आणि घाटीवली येथील शौचालय बांधकामातील गैरप्रकार याबाबतही निवेदने देण्यात आली. या सर्व विषयांवर मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. वैदही रानडे यांनी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र आश्वासनांपलीकडे ठोस कृती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोहर गुरव, जिल्हाकार्याध्यक्ष राजेंद्र बोथरे, लांजा तालुकाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपाध्यक्ष आनंद कांबळे, मुख्य संपर्क प्रमुख निलेश रहाटे, कार्याध्यक्ष प्रकाश खांडेकर, सिद्दिक खान, महिला विभाग तालुकाध्यक्ष नसिरा काझी, उपाध्यक्ष संपदा जोशी, कार्याध्यक्ष तबसुम खाचे, सचिव लता करंबेळे, तसेच महाराष्ट्र राज्य सचिव समीर शिरवडकर यांच्यासह सक्रिय कार्यकर्ते अरविंद मोहिते, सुरेश घडशी, श्रीनाथ रहाटे, राजेंद्र घोसाळकर, प्रमोद रेवणे, राजेंद्र कांबळे व नसरीन लांबे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg