loader
Breaking News
Breaking News
Foto

घारपी शाळेत मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी अनुभवला पतंगोत्सवाचा आनंद

बांदा (प्रतिनिधी) - मोबाईल, टीव्ही आणि डिजिटल खेळांच्या जमान्यात मैदानी खेळ, पारंपरिक सण आणि लोकसंस्कृतीपासून मुले दूर जात असल्याचे चित्र दिसत असताना, घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने मकर संक्रांतीनिमित्त एक आगळावेगळा आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला. पतंग उडवू चला गड्यांनो या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आकाशात रंगीबेरंगी पतंग उडवत सणाचा आनंद उत्साहात साजरा केला. मकर संक्रांती हा ऋतुपरिवर्तनाचा, नातेसंबंध दृढ करणारा आणि आनंद देणारा सण आहे. या सणाचे सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून कळावे, तसेच पारंपरिक खेळांची ओळख व्हावी, या उद्देशाने शाळेत पतंगोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सकाळपासूनच शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांनी उपलब्ध साहित्याचा वापर करून फुलपाखरू, ड्रैगन मासा, चांदोबा तसेच विविध भौमितिक आकाराचे पतंग बनवले. विद्यार्थ्यांनी बनवलेले हे विविध रंगांचे, आकारांचे पतंग आकाशात झेपावताना विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद, कुतूहल आणि समाधान स्पष्ट दिसत होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ मनोरंजनच नव्हे, तर सामूहिक सहभाग, एकमेकांना मदत करणे, संयम, एकाग्रता आणि खेळातील शिस्त यांचेही धडे मिळाले. शिक्षकांनी पतंग उडविताना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. मांजाचा गैरवापर टाळण्याचे, पक्षी व पर्यावरणाचे संरक्षण करण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. यावेळी पर्यावरणपूरक उपक्रमांवर विशेष भर देण्यात आला. प्लास्टिकमुक्त सण साजरा करण्याचा संदेश देत विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक आकाश कंदील व पर्यावरण संवर्धनाविषयी माहिती देण्यात आली.

टाइम्स स्पेशल

सण साजरा करताना निसर्गाचा समतोल राखणे किती आवश्यक आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत तिळगूळ घ्या, गोड गोड बोला... या संदेशातून आपुलकी, सौहार्द आणि एकोप्याचे महत्त्व अधोरेखित केले. या उपक्रमामुळे शाळेचे वातावरण आनंदी, उत्साही आणि संस्कारक्षम झाले. घारपी शाळेच्या या उपक्रमाचे पालक व ग्रामस्थांनी कौतुक करत, अशा उपक्रमांतूनच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे मत व्यक्त केले. पारंपरिक सण, खेळ आणि संस्कृती जपत आधुनिक शिक्षणाची सांगड घालणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला. सदरचा पतंगोत्सव् यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जे.डी.पाटील सहकारी शिक्षक आशिष तांदुळे, धर्मराज खंडागळे, मुरलीधर उमरे तसेच पालक महेश नाईक यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg