रत्नागिरी : जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या राजकारणाचे केंद्र असलेल्या जिल्हा परिषद आणि ९ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, जिल्ह्यात तातडीने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक कार्यक्रमाची अधिकृत सूचना १६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत प्रसिद्ध केली जाणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारांना आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहेत. नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्यासाठी २१ जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली असून, १८ जानेवारी रोजी सार्वजनिक सुट्टी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्जांची छाननी २२ जानेवारी रोजी होणार असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी २३, २४ आणि २७ जानेवारी असे तीन दिवस निश्चित करण्यात आले आहेत. या प्रक्रियेनंतर २७ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजल्यानंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी आणि त्यांना वाटप करण्यात आलेली चिन्हे जाहीर होतील. जिल्ह्यातील ५६ जिल्हा परिषद गट आणि ११२ पंचायत समिती गणांसाठी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० या वेळेत मतदान पार पडणार असून, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.
यावेळच्या निवडणुकीत जिल्ह्यातील ११ लाख ७३ हजार ८९९ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असून, यामध्ये ५ लाख ६४ हजार ९७६ पुरुष, ६ लाख ८ हजार ९१३ महिला आणि १० इतर मतदारांचा समावेश आहे. मतदानासाठी जिल्ह्यात एकूण १६९३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली असून, त्यामध्ये आदर्श मतदान केंद्रे, महिला संचलित ‘सखी’ मतदान केंद्रे आणि दिव्यांग संचलित मतदान केंद्रांसारख्या विशेष केंद्रांचा समावेश असणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर किमान मूलभूत सुविधांची खातरजमा करण्यात आली असून, संवेदनशील केंद्रांवर विशेष पोलीस बंदोबस्त, वेब कास्टिंग आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून कडक नजर ठेवली जाणार आहे. ही संपूर्ण निवडणूक ईव्हीएम मशीनद्वारे पार पडणार असून, प्रत्येक केंद्रावर एक ‘कंट्रोल युनिट’ वापरले जाईल. प्रशासनाने आवश्यक ईव्हीएम यंत्रांची जुळवाजुळव केली असून, अधिकची यंत्रे अहिल्यानगर जिल्ह्यातून प्राप्त करून घेतली जात आहेत. निवडणुकीच्या या महाकुंभासाठी २१६ क्षेत्रिय अधिकारी आणि १८६४ मतदान केंद्राध्यक्षांसह एकूण ५ हजार ४५५ कर्मचारी-अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.
आरक्षणाच्या बाबतीत, रत्नागिरी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण ‘नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)’ असे निश्चित झाले आहे, तर पंचायत समिती सभापती पदांसाठीही विविध प्रवर्गांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये राजापूर पंचायत समिती सभापती पद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, तर दापोलीसाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव आहे. मंडणगड, खेड, संगमेश्वर आणि लांजा या चार पंचायत समित्यांसाठी महिला आरक्षण, तर चिपळूण, गुहागर आणि रत्नागिरी या पंचायत समित्या सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या राहतील. निवडणुकीत उतरणाऱ्या उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादाही आयोगाने आखून दिली असून, जिल्हा परिषद गटासाठी ६ लाख रुपये आणि पंचायत समिती गणासांठी ४.५० लाख रुपये खर्चाची मर्यादा असेल. आचारसंहितेच्या कडक अंमलबजावणीसाठी आणि उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा स्तरावर समित्या, भरारी पथके, स्थिर सर्वेक्षण पथके आणि व्हिडिओ निरीक्षण पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी प्रशासनाने कंबर कसली असून, उमेदवारांच्या अर्जांपासून ते मतमोजणीपर्यंतच्या सर्व केंद्रांची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.



























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.