loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीतील तरुणांनी अवघ्या २२ दिवसांत साकारले देशातील पहिले ३५ फूट लांबीचे ‘आयएनएस विक्रांत’ मॉडेल

रत्नागिरी : समुद्रनगरी रत्नागिरीने पुन्हा एकदा देशपातळीवर आपली ओळख निर्माण केली आहे. येथील शिप मॉडेलर मयूर उमेश वाडेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून देशातील पहिले तब्बल ३५ फूट लांबीचे ‘आयएनएस विक्रांत’ (जुने) जहाजाचे भव्य मॉडेल केवळ २२ दिवसांत साकारले आहे. ‘कॅटेगरी क्लास’मधील हे मॉडेल संपूर्ण भारतात प्रथमच रत्नागिरीत तयार करण्यात आले असून, ही रत्नागिरीसह जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. कोलकाता येथे उभारल्या जात असलेल्या शिपयार्ड म्युझियमसाठी या मॉडेलची मागणी करण्यात आली होती. त्यांच्या मागणीनुसार तरुणांनी शिवधनुष्य हाती घेतले. पुढील परिणामांची पर्वा न करता कामाला अहोरात्र सुरुवात केली. शहरानजीकच्या मिरजोळे येथील पाटीलवाडी परिसरात गेल्या महिनाभरापासून या जहाजाच्या मॉडेलवर युद्धपातळीवर काम सुरू होते. मयूर वाडेकर यांच्यासह नीलेश मेस्त्री, महेंद्र कोलगे, दीपक मेस्त्री, आदित्य पाटील, सार्थक पाटील, रोहित पाटील, दानियल सारंग, निहारिका राऊत, फहद लाला, अर्ष फणसोपकर, निखील गावकर आणि संपदा हर्डीकर अशा एकूण 13 सहकाऱ्यांच्या मेहनतीतून हा अवघड प्रकल्प यशस्वीरीत्या पूर्ण झाला. रात्रंदिवस मेहनत घेऊन, हातातील इतर कामे बाजूला ठेवून अवघ्या 22 दिवसात कठीण काम सहज शक्य केले. त्यांनी आपल्या एकीचे बळ तर दाखवून दिलेच शिवाय दिलेला शब्द पाळून आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काम अतिशय अवघड होते. इंच इंचाची मोजणी करत लाकूड कटाई करणे म्हणजे जिकिरीचे काम. थोडा जरी फरक पडला तरी लाखो रुपयांचे हे काम अंगावर पडून मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे डोळ्यात तेल घालून निलेश मेस्त्री या तरुणाने मोजमाप परफेक्ट घेतले. त्यानंतर प्रतिकृतीने आकार घ्यायला सुरुवात केली. तिला रंगसंगती, विमाने बसवणे हुबेहूब आयएनएस मॉडेल सारखे तयार करण्यासाठी प्रत्येकाने तितकीच मेहनत घेतली. दिवस सरत होते तसे टेशन वाढत होते. मात्र आपल्या हातून चूक होऊ नये यासाठी सारेजण एकदम बारकाईने त्यावर लक्ष ठेवून होते. एकमेकांच्या विचाराने अखेर 10 डिसेंबर रोजी मॉडेल तयार झाले. त्यानंतर रंगसंगतीही पूर्ण झाली. यावेळी तरुणांनी काम पूर्ण झाल्याचा निःश्वास सोडला. मात्र धाकधूक काम होती. हे मॉडेल पाहण्यासाठी कोलकाताहून अधिकारी दाखल झाले. त्यामुळे आता काय होणार याची चिंता होती. मात्र मॉडेल पाहून ते बेहद खुश झाले. अतिशय कमी कालावधीत एवढं मोठ मॉडेल उभं केल्याबद्दल त्यांचे कौतुक तर केलेच शिवाय शाबासकीची थाप दिली. भारतात अशा प्रकारे कोठेही मॉडेल होणार नाही असे गैरवोदगार त्यांनी काढले. त्यांच्या या तोंडभर कौतुकाने काम यशस्वी झाल्याचं समाधान प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होत. हे मॉडेल रविवार 14 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजण्याच्या दरम्यान कोलकाता येथे रवाना झाले.

टाइम्स स्पेशल

२०१७ पासून शिप मॉडेलिंगच्या कलेत सक्रिय असलेले मयूर वाडेकर यांनी एनसीसीमधील शिक्षणानंतर या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिले. यापूर्वी त्यांनी आयएनएस कुकरी, आयएनएस विक्रांत, आयएनएस विशाखापट्टणम, आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकत्ता यांसारख्या नामांकित युद्धनौकांची अचूक आणि देखणी मॉडेल्स तयार केली आहेत. संपदा हर्डीकर, फहद लाला, निहारिका राऊत या एनसीसी कॅडेट आहेत. त्यांचे मार्गदर्शक लाभल्याचे वाडेकर यांनी ग्रामीण वार्ताशी बोलताना सांगितले. शिप मॉडेलिंगमध्ये करिअरच्या दृष्टीने मोठ्या संधी असल्याचे सांगत, योग्य मार्गदर्शनाअभावी थांबलेल्या या कलेत तरुणांनी पुढे येऊन स्वतःला संधी द्यावी, असे आवाहन मयूर वाडेकर यांनी केले आहे. रत्नागिरीतील या यशामुळे स्थानिक कलावंतांच्या कौशल्याला नवी दिशा आणि ओळख निर्माण झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कोलकत्ता येथे मॉडेल रवाना

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg