loader
Breaking News
Breaking News
Foto

हापूसवर गुजरातने दावा केल्याने नाराजी आंबा उत्पादक सुप्रिम कोर्टात जाणार?

रत्नागिरी (वार्ताहर):- फळांचा राजा म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोकण हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर आता गुजरातने दावा केल्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. ‘वलसाड हापूस’ नावाने भौगोलिक मानांकन मिळावे यासाठी गुजरातकडून आयोगापुढे दावा सुरू आहे. कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटनेचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांनी ही लढाई निर्णायक टप्प्यावर असून, वलसाडला मानांकन मिळाल्यास सुप्रीम कोर्टापर्यंत जाण्याची स्पष्ट भूमिका घेतली आहे. हापूस आंबा म्हटले की, गोड, चविष्ट आणि सुवासिक असा कोकण किनारपट्टीवर उत्पादित होणारा आंबा डोळ्यासमोर येतो. केवळ भारतीयच नव्हे, तर जगभरातील खवय्ये (विशेषतः अमेरिका आणि ऑस्ट्रेलियातील) या हापूसला पसंती देतात. याच कोकण हापूसला सन २०१८ मध्ये ‘हापूस’ या नावाने भौगोलिक मानांकन मिळाले आहे. भारतात ‘हापूस’ आणि ‘बासमती’ ही दोनच अशी उत्पादने आहेत, ज्यांना त्यांच्या नावाने थेट मानांकन मिळाले आहे. डॉ. विवेक भिडे (अध्यक्ष, कोकण आंबा उत्पादक आणि विक्रेता संघटना) म्हणाले, २०१७ मध्ये आमच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि २०१८ मध्ये कोकणातल्या आंब्याला ‘हापूस’ हे मानांकन मिळाले. कोकणातून नेऊन अनेक प्रांतांमध्ये आंब्याची झाडे लावली गेली, पण हापूसचा खरा राजा कोकणातूनच येतो. सन २०२२ मध्ये पुण्यातून ‘शिवनेरी हापूस’ मानांकनासाठी अर्ज आला आणि आता २०२३ पासून गुजरातकडून ‘वलसाड हापूस’ म्हणून हा क्लेम सुरू आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुजरातच्या या दाव्यामुळे कोकणातील आंबा बागायतदार संघटना आक्रमक झाली आहे. डॉ. भिडे यांच्या माध्यमातून आंबा उत्पादक कोकणाची बाजू आयोगापुढे ठामपणे मांडत आहेत. आमची भूमिका ठाम आहे. ‘हापूस’ या नावाला मानांकन मिळाले आहे आणि ते कोकणातून मिळाले आहे. आमचा विरोध कुणालाही नाही, पण आमचा हापूस हा आमच्यासाठी म्हणजेच कोकणासाठी संरक्षित राहावा, ही आमची मागणी आहे, असे डॉ. भिडे यांनी स्पष्ट केले. कोकणातील हापूस आंब्याला २०० ते ३०० वर्षांचा इतिहास आहे. कोकणातल्या आंब्याची जी वैशिष्ट्ये (चव, सुगंध, रंग) आहेत, ती इतरत्र कुठेही मिळत नाहीत. या वैशिष्ट्यांमुळेच शास्त्रीय आणि कायदेशीर कसोटीत ‘हापूस’ हे मानांकन कोकणाला मिळाले आहे. सध्या हे संपूर्ण प्रकरण भौगोलिक मानांकन आयोगाकडे सुनावणीसाठी सुरू आहे. डॉ. भिडे यांनी यावेळी निर्णायक इशारा दिला. जर हे मानांकन ‘वलसाड हापूस’ला दिले गेले, तर या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ, असे ते म्हणाले. वलसाडचा येऊ दे किंवा कर्नाटकचा, आपल्या कोकण हापूसला काही फरक पडत नाही. पालकमंत्री उदय सामंत कोकणच्या हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकनावर गुजरातने केलेल्या दाव्यावरून आणि ‘वलसाड हापूस’ नावाने अर्ज दाखल केल्यामुळे निर्माण झालेल्या वादावर महाराष्ट्राचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोकण हापूसच्या दर्जावर आपला ठाम विश्वास व्यक्त केला आहे.

टाईम्स स्पेशल

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, जगाच्या पाठीवर ‘कोकणपट्ट्यातील हापूस’ आंब्याला गोडवा, सुगंध आणि दर्जासाठी ओळखले जाते. गुजरातने ‘वलसाड हापूस’साठी अर्ज दाखल केला आहे, पण वलसाडचा येऊ दे किंवा कर्नाटकचा, आपल्या कोकण हापूसला काही फरक पडत नाही. पालकमंत्री सामंत यांनी या वक्तव्याद्वारे कोकण हापूसच्या गुणवत्तेवर विश्वास व्यक्त केला असला, तरी या भौगोलिक मानांकनाच्या मुद्द्यावर राज्य सरकार कोकणातील आंबा उत्पादकांच्या बाजूने ठामपणे उभे राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg