loader
Breaking News
Breaking News
Foto

घटनेतील तरतुदींबाबत उलट्या दिशेने प्रवास : न्या. अभय ठिपसे

रत्नागिरी : " देशामध्ये गेल्या दहा वर्षांत धर्मवाद इतका वाढला आहे, की मुस्लिम माणसाला अडवून 'जय श्रीराम' घोषणा द्यायला लावणे, विशिष्ट धर्माच्याच व्यक्तींच्या व्यवसायाच्या जागांवर कारवाई करणे यासारख्या घटना वारंवार घडत आहेत. भारताला हिंदू राष्ट्र म्हणणे हीच घटनेतील तत्त्वांची पायमल्ली आहे. हे सर्व लक्षात घेता घटनेतील तरतुदींबाबत उलट्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे," अशी भीती उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी व्यक्त केली. आपल्याला अजूनही प्रगती करायची आहे संतुष्ट राहून चालणार नाही. घटना आणि घटनेला कुठला समाज अभिप्रेत आहे हे लोकांना समजण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. संविधान जागर विचार मंच, महाराष्ट्र यांच्या वतीने रविवारी रत्नागिरीत राष्ट्रीय संविधान परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेच्या उद्घाटन सत्रात 'भारतीय संविधानातील उद्धृत सामाजिक न्याय' या विषयावर न्या. ठिपसे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परिषदेचे उद्घाटक प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव, २ महाराष्ट्र नेवल युनिट एनसीसी रत्नागिरीचे कमांडिंग ऑफिसर रामानुजन दीक्षित आणि परिषदेचे समन्वयक प्रा. दत्तात्रय कांबळे उपस्थित होते. परिषदेचे उद्घाटन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच संविधानाचे पूजन करून आणि दीपप्रज्वलनाने झाले. न्या. ठिपसे म्हणाले की, संविधानाचा अभ्यास वकील, न्यायमूर्ती यांनाही तितकासा नसतो. आपण कायदा शिकतो, पण संविधानातील तरतुदींची गरज काय, असा वाद घालणारेही वकील, न्यायमूर्ती मी बघितले आहेत. मात्र हे चुकीचे आहे, कारण संविधान हाच सर्वांत मोठा कायदा आहे. घटना म्हणजे देशासाठी तयार केलेले नियम आहेत. पण याबाबत लोकांना कमी ज्ञान आहे आणि त्याचा फारसा विचार करायची गरज वाटत नाही, हे दुर्दैव आहे."

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामाजिक न्यायासाठी संधीची समानता आवश्यक असल्याचे सांगताना न्या. ठिपसे यांनी भारतात अनेक प्रकारच्या विषमता असून, अजूनही सामाजिक समानता प्रस्थापित झालेली नाही. धार्मिक उद्रेकामुळे धोके वाढले आहेत, असे प्रतिपादन केले. सामाजिक न्यायाविषयी बोलताना त्यांनी मूलभूत अधिकार, संधींची समानता, बाळंतपणाची रजाविषयक कायदा, किमान वेतन कायदा, स्त्रियांवरील अत्याचार, विशाखा कायदा, ॲट्रॉसिटी ॲक्ट आदींवरही प्रकाश टाकला. सामाजिक न्यायाबाबतच्या अनेक तरतुदींचा आंबेडकरांमुळे घटनेत समावेश झाल्यामुळे अनेकांना फायदा झाला आहे, असेही त्यांनी सांगितले. परिषदेचे उद्घाटक डॉ. जाधव यांनी "मी भारतीय नागरिक आणि संविधान" या विषयावर मार्गदर्शन करताना १८९५ पासून संविधानासाठी १२ वेळा प्रयत्न झाले, यात ८ प्रयत्नांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा समावेश असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, मतदानाचा अधिकार धनाढ्य, शिक्षित अशा केवळ ३ टक्के लोकांनाच होता; मात्र सर्वसामान्यांसह महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळावा असा आग्रह डॉ. आंबेडकर यांनी धरला. अमेरिकेसारख्या प्रगत देशातही महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, अशा काळात, १९१९ मध्ये भारतीय महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे, यासाठी डॉ. आंबेडकर आग्रही होते, हे ते काळाच्या किती पुढे होते याचे निदर्शक आहे. डॉ. जाधव यांनी भारतीय राज्यघटना निर्मितीच्या प्रवासाचा सविस्तर आढावा घेतानाच ही दैदीप्यमान कामगिरी डॉ. आंबेडकरांव्यतिरिक्त दुसरे कोणीही करू शकला नसता, असा अभिप्राय नोंदवला. परिषदेचे समन्वयक प्रा. दत्तात्रय कांबळे यांनी, सध्याच्या काळात भारतीय राज्यघटनेचे महत्त्व ठसवण्याची आणि त्यातील मूलभूत तत्त्वांचे रक्षण करण्याची जास्त गरज निर्माण झाली असल्याचे मत नोंदवत त्याच हेतूने ही परिषद आयोजित केली असल्याचे नमूद केले.

टाइम्स स्पेशल

या परिषदेत संविधानिक मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी योगदान देणाऱ्या प्रा. डॉ. गुलाबराव राजे यांना पहिला "राष्ट्रीय संविधान सन्मान पुरस्कार" देऊन गौरवण्यात आले. तसेच प्रा. डॉ. शाहू मधाळे यांच्या "विषामृत" या कथासंग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. मानसी चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर प्रा. शिवाजी उकरंडे यांनी आभार मानले. परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी रत्नागिरी शहरातील जिल्हा रुग्णालयासमोरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून मारुती मंदिर येथील स्वा. सावरकर नाट्यगृहापर्यंत संविधान दिंडी काढण्यात आली. यामध्ये विविध शाळा-महाविद्यालयातील एनसीसी आणि एनएसएसचे विद्यार्थी सहभागी झाले. यानंतर दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्रा. सुचिता गायकवाड यांनी "भारतीय संविधान आणि महिला सबलीकरण" याविषयावर, दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी "माझ्यातील तळागाळापर्यंत खरोखर संविधान पोहोचले आहे का?" याविषयावर, तर ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत संजय आवटे यांनी "संविधान : काल, आज आणि उद्या" या विषयावर मार्गदर्शन केले. सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि आदर्शांवर आधारित "शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला" हे प्रसिद्ध सामाजिक नाटक सादर करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

रत्नागिरीत राष्ट्रीय संविधान परिषदेचे आयोजन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg