loader
Breaking News
Breaking News
Foto

हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये आकाश लकेश्रींचे यश, भारतातील पहिला खेळाडू

संगलट खेड (इक्बाल जमादार) - चिपळूण तालुक्यातील खेर्डी गावचा खेळाडू आकाश लकेश्री याने हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन सारख्या जगातील अत्यंत कठीण क्रीडा स्पर्धेत चमकदार कामगिरी करत चिपळूणच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. अवघ्या आठ तास ५२ मिनिटांत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण करत त्याने थेट वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली असून हा मान पटकावणारा तो भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन ही स्पर्धा प्रखर थंडी, उंच पर्वतरांगा, कमी ऑक्सिजन आणि अवघड चढ-उतारांमुळे जगातील सर्वाधिक कठीण स्पर्धांपैकी मानली जाते. या स्पर्धेत पोहणे, सायकलिंग आणि धावणे असे तीन टप्पे असतात. आकाशने १७ ते १८ अंश तापमान असलेल्या बर्फाळ पाण्यात २.८ किलोमीटर पोहणे अवघ्या ५३ मिनिटांत पूर्ण केले. त्यानंतर २४०० मीटर चढ असलेला ८८ किलोमीटरचा सायकलिंग टप्पा चार तास २७ मिनिटांत पार केला. शेवटी १७०० मीटर चढाचा २१ किलोमीटर धावण्याचा टप्पा तीन तास २१ मिनिटांत पूर्ण करत त्याने एकूण स्पर्धा यशस्वीपणे संपवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मूळचा खेर्डीचा असलेला आकाश सध्या पुण्यात वास्तव्यास आहे. २०१८ साली स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये एमबीए सुरू केले असतानाच आर्थिक अडचणींमुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावे लागले. मात्र याच काळात त्याने ट्रायथलॉन या खेळाचा मार्ग निवडत स्वतःसाठी नवे आयुष्य घडवण्याचा निर्णय घेतला. पुण्यातील प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्याने कठोर सराव सुरू केला. स्पोर्ट्स मॅनेजमेंटमध्ये काम करत असताना सचिन तेंडुलकरसह अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंशी संपर्क येण्याची संधी मिळाली आणि त्याचा अनुभवाने त्याच्या वाटचालीला अधिक बळ दिले. २०२० मध्ये दुबईत त्याने पहिली मोठी ट्रायथलॉन स्पर्धा पूर्ण केली. लॉकडाऊन काळात चिपळूणमध्ये परतल्यानंतर २०२१ मध्ये रत्नागिरी येथे कोचिंग सुरू केले. पुढे २०२२-२३ मध्ये पुन्हा पुण्यात स्थलांतर करून प्रशिक्षणात सातत्य राखले. २०२४ मध्ये ‘स्काय एंड्युरन्स क्लब’ नावाने स्वतःचे कोचिंग सेंटर सुरू करत अनेक तरुणांना मार्गदर्शन देण्यास सुरुवात केली. कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना त्याने नेपाळमध्ये झालेल्या एक्स्ट्रीम ट्रायथलॉनमध्ये सहभाग घेतला आणि यशस्वीपणे स्पर्धा पूर्ण करून इतिहास घडवला.

टाईम्स स्पेशल

या स्पर्धेच्या तयारीसाठी आकाशने लेह–लडाखमध्ये अतिशय कठोर सराव केला. त्या काळात भारत–पाकिस्तान तणावामुळे निर्माण झालेल्या अडचणी असूनही त्याने सराव खंडित केला नाही. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने आपल्या जिद्दीचे आणि चिकाटीचे दर्शन घडवले. या यशस्वी प्रवासात अभिजीत यादव, सचिन खेर, संजय इथापे, विजय अनपट आणि शंतनु शितोळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभल्याचे आकाशने नमूद केले आहे. आकाश लकेश्री यांच्या या ऐतिहासिक यशामुळे चिपळूणचा नावलौकिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झाला असून आगामी वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg