loader
Breaking News
Breaking News
Foto

’कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन’ तिसरे पर्व ४ जानेवारी २०२६ रोजी रत्नागिरीत!

रत्नागिरी: (जमीर खलफे) - मराठी भाषेला समर्पित असलेली जगातील पहिली अर्ध मॅरेथॉन अर्थात ’कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन’चे तिसरे पर्व ४ जानेवारी २०२६ रोजी, नवीन वर्षाच्या पहिल्या रविवारी, रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने रत्नागिरी शहर पुन्हा एकदा ’धावनगरी’ म्हणून सज्ज होणार आहे. जवळपास ३०० हून अधिक शहरे आणि १२ राज्यांतून २२०० हून अधिक ’फिटनेस टुरिस्ट’ कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनच्या माध्यमातून रत्नागिरीत येत आहेत. ’कोकणवासियांनी कोकणवासीयांसाठी आणि संपूर्ण जगासाठी आयोजित केलेली मॅरेथॉन’ असे जिचे वर्णन केले जाते, त्या या मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी सर्व कोकणवासीय सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून उत्साहाने कामाला लागले आहेत. या मॅरेथॉनसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख २० डिसेंबर असल्याची घोषणा आज हॉटेल सी फॅन्स येथे आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जगात आजपर्यंत कुठलीही अर्ध मॅरेथॉन कुठल्याही भाषेसाठी समर्पित केली गेलेली नाही. हे महत्त्वपूर्ण ’शिवधनुष्य’ कोकणवासीय सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या माध्यमातून पेलत आहेत. मॅरेथॉन दरम्यान जास्तीत जास्त मराठी संज्ञांचा वापर केला जाणार असून, केवळ अत्यावश्यक ठिकाणीच इंग्रजी भाषेचा वापर असेल, अशी माहिती सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी पत्रकार परिषदेत दिली. या उपक्रमाची माहिती देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून २५ हून अधिक जिल्ह्यांमधील अनेक धावपटूंना भेट देण्यात आली आहे. यासाठी कोकण कोस्टल टीमने ३० दिवसांत जवळपास ४००० किलोमीटरचा प्रवास केला. मुंबई रोड रनर्स या संस्थेमार्फत प्रत्येक मॅरेथॉनचे ऑडीट केले जाते आणि त्यानुसार रेटिंग दिले जाते. विशेष अभिमानाची बाब म्हणजे, या रेटिंगमध्ये कोकणवासीयांची ही मॅरेथॉन प्रथम क्रमांकावर आहे.

टाईम्स स्पेशल

यावेळी भारताबाहेर राहणारे धावपटू आभासी पद्धतीने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली. आर्यक सोल्युशन्स या आयटी कंपनीच्या माध्यमातून यासाठी एक विशेष अ‍ॅप तयार करण्यात येत आहे, असे आर्यक सोल्युशन्सचे प्रशांत आचार्य यांनी सांगितले. या मॅरेथॉनला खास बनवणारी वैशिष्ट्ये म्हणजे २१ किलोमीटरचा ’एक दिशा’ मार्ग, आंब्याच्या आकाराचे खास मेडल, समुद्रकिनारी सांगता, ९ गावामधून जाणारा जैवविविधता अनुभवता येणारा मार्ग, समुद्रकिनारी मिळणारा ’उकडीचा मोदक’, दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अंकिता पाटकर आणि त्यांची झुंबा टीम मॅरेथॉनपूर्वी झुंबा सेशन घेणार आहे. तसेच, आयपॉपस्टार फेम राधिका भिडे हिने या मॅरेथॉनचे गाणे संगीतबद्ध केले आहे. सर्व रत्नागिरी आणि कोकणवासियांनी या त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे कळकळीचे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिकांसाठी आनंद सागर अपार्टमेंट, मजगाव रोड येथील कोकण कोस्टल मॅरेथॉन ऑफिसमध्ये ऑफलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg