loader
Breaking News
Breaking News
Foto

जांभारी भैरी मंदिर प्रांगणात घुमला बाल क्रिडामहोत्सव

रत्नागिरी: (जमीर खलफे) - केंद्रस्तरीय क्रिडा स्पर्धा 2025/26 चे यजमान पद यावर्षी केंद्रशाळा मराठी जांभारी या शाळेला मिळाल्याने जांभारीवासियांना एक आगळावेगळा महोत्सव पहाण्याची संधी मिळाली.ज्या ठिकाणी या स्पर्धा घेण्यात आल्या ते भैरीदेव मंदिराचे भव्य पटांगण, भव्य स्टेज, भोजन व्यवस्था असणारी भव्य इमारत आणि पताका लावून सजविलेला सुंदर परिसर आदी उपलब्धीमुळे क्रिडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. सकाळच्या सत्रात पंचक्रोशीतील छोटे क्रिडापट्टू विविध वाहनाने जांभारीच्या दिशेने येताना दिसत होते. एक वेगळाच उत्साह त्यांच्या मध्ये दिसत होता. बघता बघता 9.00 वाजताच्या सुमारास भैरी मंदिरात किलबिलाट सुरू झाला. मंदिराला नवचैतन्य देणारा अनोखा उत्सव साजरा होताना दिसत होता.केंद्रशाळा जांभारीच्या सर्व शिक्षक वर्गाची लगबग सुरू झाली. स्टेजवर महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून व परिसरातून आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळेतील मुलांनी श्रवणीय स्वागतगीत गाऊन वातावरणात चैतन्यमय केले.उपस्थित स्पर्धेक,पालक, शिक्षकवर्ग व ग्रामस्थ यांना सकाळच्या सत्रात चहा नाष्ता देण्यात आला. क्रिडा स्पर्धेला सुरुवात करण्यापूर्वी ढोलताशांच्या गजरात क्रिडाज्योतीचे आगमन झाले व त्यानंतर श्रीफळ वाढवून क्रिडा स्पर्धेला सुरुवात झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सुरूवातीला पटांगणात एका बाजूला मुलांची कबड्डी तर दुस-या बाजूला मुलींची लंगडी स्पर्धा सुरू झाली. आपल्या शाळेतील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी शाळेतील शिक्षक वर्ग, पालक, ग्रामस्थ व मुले स्पर्धेकांच्या पाठीशी उभी राहून प्रोत्साहन देत असल्याचे विलोभनीय दृश्य होते. चिमुकल्याना मिळालेल्या पाठींबामुळे जिंकण्याच्या जिद्दीने प्रत्येक विद्यार्थी खेळ करताना दिसत होते. परिसरातील मुलांना घेऊन आलेले शिक्षकवर्गांनी स्पर्धा आपलीच असल्यासारखे कुणी पंच तर कुणी केंद्र शाळा जांभारीच्या शिक्षकांनी दिलेली जबाबदारी पार पाडताना दिसत होते. स्पर्धा रंगतदार होत असताना कुणाचा जय तर कुणाचा पराजय होतानाही खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धा रंगतदार होत गेली. दुपारच्या सत्रापर्यत मुलामुलींची कब्बडी, लंगडी स्पर्धा संपन्न झाल्या होत्या. जांभारी गावातील शिक्षक पालक संघ व ग्रामस्थ महिला मंडळ यांच्या नियोजनामुळे उपस्थित सर्वांना दुपारचं जेवण देण्यात आले.दुपारच्या सत्रानंतर लांब उडी, उंचउडी, गोळाफेक, थाळी फेक आणि धावण्याच्या स्पर्धा संपन्न झाल्या. जिंकलेली मुले आनंद उत्सव साजरे करत होते तर काही मुले हरण्याचे दु:ख सहन न झाल्याने रडताना ही दिसून आले. केंद्र शाळा जांभारीचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांनी सर्व स्पर्धांचे योग्य पद्धतीने नियोजन केल्याने स्पर्धाउत्सव रंगतदार झाला. सायंकाळी सर्व विजेत्यां मुलांना मेडल व सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

टाइम्स स्पेशल

केंद्रशाळा जांभारीला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले त्या दिवसापासून सर्व गावातील वाडीने देणगीच्या स्वरूपात रोख रक्कम तर कुणी वस्तू रूपाने देणगी दिली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तसेच स्पर्धेच्या सोयीसुविधेसाठी शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत जांभारी, भैरीदेव देवस्थान समिती, ग्रामस्थ बंधूभगिंनी व परिसरातील शिक्षणप्रेमींनी भरघोस मदत देऊन स्पर्धा महोत्सवाची शोभा वाढवली. एकूणच सर्व स्पर्धा यशस्वी व निर्विवादपणे पार पडल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली त्यांचे केंद्र शाळा मराठी जांभारीच्या वतीने आभार मानण्यात आले व विजेत्या स्पर्धकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg