loader
Breaking News
Breaking News
Foto

निर्मल ग्रामपंचायत शिवार आंबेऱेचा सुवर्णमहोत्सव उत्साहात

रत्नागिरी : निर्मल ग्रामपंचायत शिवार आंबेरे, ता. व जि. रत्नागिरी यांच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला पाच दिवसीय भव्य सोहळा विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. बुधवार दि. १३ मे ते रविवार दि. १७ मे २०२६ या कालावधीत ग्रामपंचायत प्रांगणात पार पडलेल्या या महोत्सवाला ग्रामस्थ, युवक, महिला, विद्यार्थी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुवर्णमहोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या गेल्या ५० वर्षांच्या विकासप्रवासाचा आढावा घेण्यात आला. गावातील पायाभूत सुविधा, स्वच्छता अभियान, पाणीपुरवठा, शिक्षण, सामाजिक एकोपा व ग्रामविकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ मार्फत हळदीकुंकू व बचत गट प्रदर्शन, युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. जिजाऊ संस्थेमार्फत महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ हा विशेष कार्यक्रम पार पडला. तसेच डॉ. योगेश हातिसकर यांच्या टीमतर्फे आरोग्य तपासणी शिबिर, डॉ.मालशे शास्त्रज्ञ भाट्ये नारळी संशोधन केंद्र प्रमुख आणि मा.अंकुश. कांबळे कृषी विस्तार अधिकारी रत्नागिरी यांचे शेतकऱ्यांसाठी आंबा, काजू व फणस प्रक्रिया उद्योग मार्गदर्शन, वृक्षारोपण अभियान तसेच सर्वांना खुली असणारी पंचक्रोशीतील Gen - Z साठी रिल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रेक्षकांची मने जिंकली. स्थानिक कलाकार, महिला मंडळे व युवकांनी लोककला, नृत्य, नाटिका आणि संगीताचे विविध कार्यक्रम सादर करून वातावरण रंगतदार केले. गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान नागरिकांचा सत्कार करण्यात आला. सुवर्णमहोत्सवानिमित्त ग्रामपंचायतीच्या भावी विकास आराखड्याबाबत माहिती देताना सरपंच-प्रशासक राजन रोकडे यांनी गावाचा सर्वांगीण विकास, पर्यावरण संवर्धन व डिजिटल ग्रामव्यवस्था निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष दयानंद लाखण यांनी गावातील शैक्षणिक संकुल उभारणीसाठी ग्रामस्थांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. हा आपला कार्यक्रम आपल्या सर्वांनी केलेल्या योगदानामुळे संपन्न झाला. त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे प्रतिनिधी म्हणून अण्णा सामंत यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. गावातील विविध समस्या सोडविण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्वासन त्यांनी दिले

टाईम्स स्पेशल

यावेळी मंत्री महोदय डॉ.उदय सामंत यांच्या सौजन्याने “केला तुका आणि झाला माका” या व्यावसायिक नाटकाचा लाभही पंचक्रोशीतील नागरिकांनी घेतला. संपूर्ण सुवर्णमहोत्सव यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, शिवार आंबेरे ग्रामविकास प्रतिष्ठानचे पदाधिकारी, महिला मंडळे, युवक वर्ग तसेच लाखणवाडीतील ग्रामस्थ व महिलांनी विशेष मेहनत घेतली. युवक प्रतिनिधी कौस्तुभ धनावडे, वेदिका मेस्त्री, सोहम रोकडे, दिवाकर तरळ, सुदेश नाटेकर यांनीही कार्यक्रमाच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावली. शिवार आंबेरे प्रीमियर लीगच्या पारितोषिक वितरण समारंभाने महोत्सवाची सांगता झाली. गावाच्या इतिहासातील हा सुवर्णमहोत्सव एक संस्मरणीय पर्व ठरल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे पंचक्रोशीतील लोकांनी विशेष कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg