loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडीत 'सकल हिंदू संमेलन' संपन्न

सावंतवाडी (प्रतिनिधी): "छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने स्वधर्म रक्षक होते. गोव्यात पोर्तुगीज सत्तेच्या काळात ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू धर्मीयांचा छळ करून त्यांचे सक्तीने धर्मांतरण केले होते. ही बाब समजताच महाराजांनी बारदेशवर स्वारी करून हिंदूंचा छळ करणाऱ्या चार पाद्री मिशनऱ्यांना धडा शिकवला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम आणि इतिहासाचा अभिमान बाळगताना, त्यांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत," असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवचरित्रकार व हिंदवी परिवाराचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे यांनी येथे केले. ​येथील राणी पार्वती देवी हायस्कूलच्या सभागृहात हिंदू संमेलन समन्वय समिती, सावंतवाडीच्या वतीने 'सकल हिंदू संमेलना'चे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष तथा कीर्तनकार विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या हस्ते झाले. याप्रवेळी व्यासपीठावर युवा कीर्तनकार सायली गावडे, ज्ञान प्रबोधनी सिंधुदुर्गचे मुख्य समन्वयक अमित नाईक, आणि सहसंयोजक सुहास सातोस्कर उपस्थित होते. या संमेलनात हिंदू समाजाने संघटित होण्याची गरज व्यक्त करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्य वक्त्ये डॉ. शिवरत्न शेटे पुढे म्हणाले की, "छत्रपती शिवाजी महाराजांनी पराधर्मीयांचा आदर राखतानाच स्वधर्मावर होणारे आक्रमण नेहमीच परतवून लावले. दक्षिणेत हिंदू मंदिरांच्या जागी बांधण्यात आलेल्या मशिदींवर आक्रमण करून त्यांनी पुन्हा मंदिरे उभारली. त्या काळात धर्मांतर झालेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात स्थान नसतानाही, महाराजांनी मुस्लिम झालेल्या नेताजी पालकरांना सन्मानाने पुन्हा हिंदू धर्मात घेतले. यावरून महाराजांची आपल्या धर्माबद्दलची जागृतता दिसून येते." यावेळी अमित नाईक यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताब्दी वर्ष असून, या निमित्ताने 'पंच परिवर्तन' मंत्रावर काम झाले पाहिजे. यात स्वत्व (स्वदेशीचा वापर), सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण आणि नागरिक कर्तव्य यांचा समावेश आहे. जातीभेद विसरून हिंदूंनी एकत्र यावे, विभक्त कुटुंब पद्धतीमुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र संवाद साधावा आणि वृक्षारोपण व पाण्याची बचत करून पर्यावरण रक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले. गवंडळकर महाराज उद्घाटक विश्वनाथ गवंडळकर महाराज यांनी सांगितले की, आपण धर्माचे रक्षण केल्यास भगवंत आपले रक्षण करतील. आज काही मंडळी वारकरी संप्रदायात घुसखोरी झाल्याचे खोटे आरोप करून हिंदू धर्मात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्वार्थी मंडळींना चोख उत्तर दिले पाहिजे. तर युवा कीर्तनकार सायलीताई गावडे यांनी निष्काम कर्म करून प्रत्येकाने धर्मरक्षणाचे काम केले पाहिजे, असे सांगितले.

टाईम्स स्पेशल

या संमेलनात सामाजिक व आध्यात्मिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल विनया बाड (निरामय केंद्र), रवींद्र जाधव (सामाजिक बांधिलकी), बाळकृष्ण राऊळ (माजी सैनिक), पौर्णिमा मिसाळ (आध्यात्मिक क्षेत्र) आणि आनंद मेस्त्री यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ​कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहसंयोजक सुहास सातोस्कर यांनी केले. उपस्थितांचे स्वागत अपूर्वा माईंडकर, अंजली नातू, अण्णा मापसेकर, चिन्मय रानडे आणि आनंद साधले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळ पुराणिक यांनी केले. ​या प्रसंगी सावंतवाडी संस्थांनचे लखमराजे भोसले, परीट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, सिंधू सेवा मित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रवीणकुमार ठाकरे, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, नगरसेवक प्रतीक बांदेकर, एड. सिद्धार्थ भांबुरे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक व हिंदू बांधव उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg