loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची रत्नागिरी दक्षिण जिल्हा प्रभारीपदी नियुक्ती

रत्नागिरी: राज्यातील आगामी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच भारतीय जनता पक्षाने आपली संघटनात्मक बांधणी अधिक आक्रमक करण्यास सुरुवात केली आहे. याच रणनीतीचा एक भाग म्हणून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांची रत्नागिरी दक्षिण जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कोकणच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात भाजपची मुळे घट्ट करण्याची मोठी जबाबदारी आता डावखरे यांच्या खांद्यावर आली असून, त्यांच्या या एन्ट्रीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. ​आमदार निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर प्रतिनिधित्व करत असले, तरी गेल्या काही काळात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मतदारांशी त्यांचा संपर्क तुटल्याची चर्चा खुद्द भाजप कार्यकर्त्यांमध्येच होती. निवडणुका जिंकल्यानंतर ते मतदारांना विसरले की काय, असा सूर उमटत असतानाच पक्षाने त्यांना याच भागाची जबाबदारी देऊन एक प्रकारे 'बॅटल ग्राऊंड'वर उतरवले आहे. मात्र, डावखरे यांच्यासाठी हा मार्ग सोपा नक्कीच नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सध्या रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आणि विशेषतः मंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू आमदार किरण सामंत यांचे मोठे वर्चस्व आहे. राजापूरपासून ते चिपळूण-गुहागरपर्यंत सामंत बंधूंनी स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपली पकड मजबूत केली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये त्यांच्या समर्थकांचा भरणा असून, नगरपालिकेतही त्यांचेच वर्चस्व राहिले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या वेळी रत्नागिरी नगरपालिकेच्या जागावाटपात भाजपने ११ जागांची मागणी केली असताना उदय सामंत यांनी भाजपला केवळ ६ जागांवर समाधान मानण्यास भाग पाडले होते. यावरून जिल्ह्यात भाजपची ताकद मित्रपक्षासमोर काहीशी कमी पडत असल्याचे चित्र आहे. ​अशा परिस्थितीत, आमदार डावखरे पक्षवाढीसाठी नेमकी कोणती 'जादू' करणार, हा कळीचा मुद्दा आहे. त्यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे पक्षातील अंतर्गत मरगळ झटकणे. भाजपचे अनेक माजी जिल्हाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते सध्या सक्रिय राजकारणापासून काहीसे दूर आहेत. या अनुभवी नेत्यांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणून त्यांना कामाला लावणे, हे डावखरेंसाठी पहिले शिवधनुष्य असेल. दुसऱ्या बाजूला, सामंत बंधूंच्या वाढत्या प्रभावापुढे भाजपचा स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवण्याचेही आव्हान त्यांच्यासमोर आहे. ​निरंजन डावखरे यांची ही नियुक्ती पक्षाला उभारी देणार की केवळ कागदोपत्री प्रभारी म्हणून त्यांची नोंद होणार, हे येणारा काळच ठरवेल. मात्र, त्यांच्या नियुक्तीमुळे भाजपच्या गोटात हालचालींना वेग आला असून, पक्षवाढीसाठी त्यांना आता प्रचंड धडपड करावी लागणार आहे, हे मात्र निश्चित!

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg