loader
Breaking News
Breaking News
Foto

कळसुली गडगेवाडी येथे घरफोडी करत साडे बावीस लाखाचा मुद्देमाल लंपास

कणकवली (प्रतिनिधी)- घरातील मंडळी भात कापणीसाठी शेतात गेली असल्याची संधी साधत कळसुली- गडगेवाडी येथे दिवसाढवळ्या झालेल्या एका धाडसी घरफोडीत चोरांनी २० तोळे सोने, ११ तोळे चांदी आणि सुमारे सव्वा दोन लाख रुपये रोख रक्कम असा सुमारे साडेबावीस लाखाचा ऐवज घेऊन पलायन केल्याची घटना कळसुली गडगेवाडी येथे घडली आहे. मंगळवारी दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास ही धाडसी चोरी झाली आहे. कळसुली गडगेवाडी येथील विनायक भिकाजी दळवी (वय ५३) यांच्या घरी ही चोरी झाली. सध्या भात कापणीचा हंगाम सुरू असल्याने कळसुली गडगेवाडी येथील विनायक दळवी कुटुंबीय भात कापणीसाठी शेतात गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत घराला लक्ष्य करून ही चोरी करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

याबाबत अधिक माहिती अशी की, कळसुली गडगेवाडी येथील रहिवासी विनायक दळवी हे त्यांच्या कुटुंबासह मंगळवारी दुपारी भात कापणीच्या कामासाठी शेतात गेले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. दुपारी १२.३० ते १ वाजेच्या सुमारास हा चोरीचा प्रकार घडला. दळवी कुटुंब दुपारी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या पाठीमागील दरवाजा उघडा दिसला. त्यांनी घरात प्रवेश केला असता, घरातील कपाटांमधील सर्व साहित्य अस्ताव्यस्त अवस्थेत फेकलेले दिसले. कपाटांची तपासणी केली असता, त्यामधील अंदाजे २० तोळे सोने, ११ तोळे चांदीचे दागिने आणि सुमारे २ लाख १५ हजार रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे लक्षात आले. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची किंमत लाखोंच्या घरात आहे. दरम्यान दुपारच्या सुमारास विनायक दळवी यांचे घर बंद असल्याने घरावर माकड आले असल्याचे समजते. माकडांचा वावर कळसुली गावात मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने या प्रकाराकडे दळवी कुटुंबीयांनी दुर्लक्ष केले होते. मात्र घरी आल्यानंतर घराचा दरवाजा त्याचप्रमाणे घरातील साहित्य कपाट व अन्य वस्तू विस्कटलेल्या दिसल्याने चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

टाइम्स स्पेशल

या घटनेची माहिती मिळताच कळसुलीचे सरपंच सचिन पारधिये आणि पोलिस पाटील सारिका कदम यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कणकवली पोलिस तात्काळ दळवी यांच्या घरी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून तपासणी सुरू केली. पोलीस उपनिरीक्षक महेश शेडगे, कनेडी आउटपोस्टचे पोलीस हवालदार सुनील वेंगुर्लेकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी जात पाहणी केली. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या चोरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या चोरीमध्ये चोरट्याने कशाप्रकारे डाव साधला याबाबत तर्कवितर्क लढविले जात असून चोरी झालेली घरे रस्त्याच्या बाजूला असल्याने चोरट्याने चोरीला येताना दुचाकीचा आसरा घेतला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घरापासून जाण्यासाठी तीन रस्ते असल्याने नेमके चोरटे कोणत्या दिशेने गेले याबाबतही तपासाला वेग आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg