loader
Breaking News
Breaking News
Foto

नाणीजमध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणार्‍या शोभायात्रेत आनंद, उत्साह, चैतन्याचा अनुभव, लाखोंच्या डोळयांचे पारणे फिटले

ही शोभायात्रा आनंद, उत्साह, चैतन्याचा अनुभव देऊन गेली. जुना मठ ते सुंदरगड मार्गावर लोकसंस्कृतीचा जागर पाहताना लाखो भाविक व पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. दरम्यान २ दिवसांच्या या वारी उत्सवात रविवारी दिवसभरात अनेक धार्मिक कार्यक्रम, प्रवचन, रक्तदान संकल्पपूर्ती निमित्ताने वैशिष्टपूर्ण काम करणार्‍यांचा सत्कार, असे अनेक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले. रविवारी संतशिरोमणी गजानन महाराज यांचा प्रकट दिन व आद्य जगद्गुरु रामानंदचार्य यांची जयंती होती. त्यानिमित्त श्री क्षेत्र नाणीज येथे उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीचे विराट दर्शन घडविणारी शोभायात्रा ही या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी यांच्या संकल्पनेतून ही शोभायात्रा होत असते. परंपरेप्रमाणे रविवारी देखील ती अतिशय उत्साहात आणि शिस्तबद्धपणे निघाली. या शोभायात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, मध्यप्रदेश, तेलंगणा आदी राज्यांतील लोककलांचे दर्शन घडले. संपूर्ण शोभायात्रेचे आकर्षण होते नाणीज दक्षिण पिठाची हत्तीण नारायणी. तिने प्रारंभी जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. शोभायात्रेत तिचा मान अग्रभागी होता. बालगोपाळांची ती आकर्षण ठरली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शोभायात्रेत नृत्याचे अनेक प्रकार सादर झाले. त्यात कोळी नृत्य, बंजारा समाजाचे पारंपारिक नृत्य, तूर नृत्य, शिवाली व टिपरी नृत्य, आदिवासी नृत्य, भिल्ल वाघ नृत्य आदीं सारी नृत्ये सादर झाली. ती या यात्रेचे आकर्षण ठरली होती. या यात्रेत अनेक सुंदर देखावे सादर करण्यात आले. ठाण्याचा गणपती उत्सव देखावा, उत्तर अहिल्यानगराचा श्री गजानन महाराज देखावा, सातारची संत परंपरा, सोलापूरचा आदिनाथ मूर्ती देखावा, दक्षिण रायगडाचा भगवान श्रीकृष्ण मूर्ती देखावा, जालन्याचा छत्रपती शिवरायांचा शंकर पिंडी पूजा देखावा सुरेख होता. दक्षिण ठाण्याचा नवनाथ देखावा, नांदेडचा भगवान रामानंदचार्य देखावा, हिंगोली येथील संत शिरोमणी श्री गजानन महाराज देखावा, रात्रीचे राघवेंद्र स्वामी पथक, बिदरचा महात्मा बसवेश्वर देखावा, कमरेड्डीचा तिरुपती बालाजी देखावा शोभायात्रेचे वेगळेपण होता. शोभायात्रेत वाद्यांचे अनेक प्रकार होते. पुण्याचे ढोल पथक, बीडचे हलगी व संबळ वाद्य पथक, त्या त्या नृत्य प्रकारात येथील पारंपरिक वाद्ये वाजवली जात होती. सोबत टाळांचा गजर होता. जोतिबाची सासन काठी होती. वसईचे भजन होते. निजामाबादचे बंद कम्मा पथक होते. शोभायात्रेत सर्वांचे आकर्षण म्हणजे जगद्गुरु रामानंदचार्य नरेंद्राचार्यजी यांचा रथ होता. रथावर आरूढ झालेले जगद्गुरु नरेंद्राचार्यजी अतिशय प्रसन्न मुद्रेने भक्तांना आशिर्वाद देत होते. भाविक हात उंचावून त्यांना अभिवादन करीत होते. या रथात प.पू. कानिफनाथ महाराज हे देखील स्थानापन्न होते.

टाइम्स स्पेशल

शोभायात्रेत साधुसंतांचे रथही होते. देशातील वेगवेगळ्या आखाड्याचे साधुसंत या सोहळ्यासाठी नाणीज क्षेत्री आले आहेत. त्यांचे रथ या मिरवणुकीत होते. शोभायात्रेत मोठया संख्येने नागरिकही सहभागी झाले. सकाळी १० वा.नंतर उन्हाचा कडाका जाणवू लागला. तरीही कलावंतांचा उत्साह अवर्णनीय होता. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी यात्रेची संागता सुंदरगडावर झाली. त्यानंतर भक्तांना महाप्रसाद देण्यात आला. जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराजंाच्या संकल्पनेतून नुकतेच लाखो लोकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले होते. आपले सदगुरू नरेंेद्राचार्यजी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्री सेवकांनी लाखो रक्तकुपिका संकलित केल्या. जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात झालेल्या रक्तदान शिबिरातून १,७१,१५० कुपिकांचे संकलन झाले. हा एक विक्रम आहे. रविवारी या संकल्पपूर्तीत तन, मन, धनपूर्वक सहभागी झालेल्या श्री सेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हा एक अभिमानाचा क्षण होता. रात्री प.पू. कानिफनाथ महाराज यांचे हिंदीतून अमृतमय प्रवचन झाले. त्यानंतर सर्व भाविकांचे आकर्षण असलेल्या जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांचे अमृतमय प्रवचन झाले व सोहळ्याची सांगता झाली. तत्पूर्वी रविवारी सायंकाळी दोन दिवस सुरू असलेल्या मोफत आरोग्य शिबिराची सांगता झाली. त्यात नामवंत डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार केले. भाविकांनी त्याचा लाभ घेतला. सुंदरगड व नाथांचे माहेर येथील मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली होती. दिवसभर दर्शनासाठी तिथे रांगा लागल्या होत्या. संतपीठदेखील आकर्षक पानाफुलांनी सजवण्यात आले होते. सोहळ्यासाठी सुंदरगडावर दोन दिवस लाखो भाविक दाखल झाले होते. त्यांच्यासाठी पाणी, २४ तास महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. सुंदरगडावरील सर्व कार्यक्रमांचा आनंद त्यांनी घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg