loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात १४ वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त; आरोग्य विभागाची न्यायालयात कबुली

कोल्हापूर (प्रतिनिधी) - सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांबाबत आणि रखडलेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलबाबत आरोग्य विभागाने कोल्हापूर सर्किट बेंचसमोर प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात रुग्णालयातील १९ मंजूर नियमित वैद्यकीय अधिकारी पदांपैकी १४ पदे रिक्त असल्याचे आरोग्य विभागाने मान्य केले आहे. मात्र, या रिक्त पदांच्या जागी पर्यायी व्यवस्था म्हणून २५ वैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ सेवा देत असल्याचा दावाही विभागातर्फे करण्यात आला आहे. अभिनव फाऊंडेशनतर्फे दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर आज कोल्हापूर सर्किट बेंचसमोर सुनावणी पार पडली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे की, १४ नियमित पदे रिक्त असली तरी डॉ. शंतनु तेंडुलकर (M.D. Medicine), डॉ. धीरज सावंत, डॉ. भक्ती कुंभार यांच्यासह एकूण २५ अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा प्रभावित झालेली नाही, असे विभागाचे म्हणणे आहे. तसेच, राज्यस्तरावर १४४० पदभरतीची जाहिरात २७ फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्याद्वारे रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंतवाडीत ६ मार्च २०१९ रोजी मंजूर झालेल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा मुद्दा अद्यापही प्रलंबित आहे. रुग्णालयाच्या जागेबाबत राजघराण्याच्या वतीने उच्च न्यायालयात द्वितीय अपील दाखल असल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणाचा निकाल लवकर लागावा म्हणून शासनाने उच्च न्यायालयात अर्ज केला आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या अभिप्रायानुसार, जुनी कुटीर रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल बांधणे तांत्रिकदृष्ट्या शक्य आहे. मात्र, याबाबत शासनाकडून अद्याप स्पष्ट मार्गदर्शन प्राप्त झालेले नाही. अभिनव फाऊंडेशनने सुचविलेल्या भटवाडी येथील पर्यायी जागेबाबत बांधकाम विभागाचा अहवाल प्राप्त झाला आहे. या संदर्भात सहाय्यक संचालक आयुक्तालय, मुंबई यांच्याकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून ते अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे नव्या हॉस्पिटलच्या बांधकामाचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. आरोग्य विभागाने प्रतिज्ञापत्रात रिक्त पदांची माहिती दिली असली तरी, रक्तपेढीतील रिक्त पदे आणि न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या अहवालावर नेमकी काय ठोस कार्यवाही केली, याचा खुलासा केलेला नाही, असे अभिनव फाऊंडेशनचे वकील महेश राऊळ यांनी म्हटले आहे. यामुळे आगामी सुनावणीत आरोग्य विभाग काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg