loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी पोलिसांच्या 'डायल ११२' सेवेचा राज्यात डंका; प्रतिसाद वेळेत मोठी सुधारणा करत ७ व्या क्रमांकावर झेप

​रत्नागिरी - ​रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या 'डायल ११२' या आपत्कालीन सेवा प्रणालीने नागरिकांना अत्यंत जलद मदत पुरवण्यात मोठे यश मिळवले आहे. जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात येणाऱ्या भांडणे, अपघात, महिलांच्या तक्रारी, वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती आणि कायदा व सुव्यवस्थेच्या कॉल्सवर पोलीस पथके आता अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. या तत्परतेमुळे अनेक घटनांमध्ये जीवितहानी टाळणे आणि वाद शांत करणे पोलिसांना शक्य झाले आहे. गेल्या वर्षभरात म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर २०२५ या काळात रत्नागिरी पोलिसांना एकूण ७,४०० कॉल्स आले होते. त्यावेळी पोलिसांचा सरासरी प्रतिसाद वेळ (घटनेच्या ठिकाणी पोहोचण्याचा काळ) ८ मिनिटे ४५ सेकंद इतका होता आणि या कामगिरीत जिल्हा महाराष्ट्रात ३२ व्या क्रमांकावर होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ही सेवा अधिक वेगवान करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी विशेष लक्ष दिले. त्यांनी दररोज कामाचा आढावा घेऊन अडचणी सोडवल्या आणि पोलीस कर्मचाऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. या नियोजनाचे अत्यंत सकारात्मक परिणाम आता दिसून आले आहेत. जानेवारी २०२६ ते मे २०२६ या पाच महिन्यांच्या कालावधीत पोलिसांना ९२१ कॉल्स प्राप्त झाले. यादरम्यान पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवत आपला प्रतिसाद वेळ ६ मिनिटे ३४ सेकंदांवर आणला. या उल्लेखनीय सुधारणेमुळे रत्नागिरी जिल्ह्याने थेट २५ क्रमांकांची मोठी झेप घेत महाराष्ट्रात ३२ व्या क्रमांकावरून थेट ७ वा क्रमांक पटकावला आहे आणि पहिल्या १० जिल्ह्यांमध्ये मानाचे स्थान मिळवले आहे.

टाईम्स स्पेशल

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्तम समन्वयामुळेच हे यश मिळाले असून, भविष्यातही ही सेवा अशीच प्रभावी ठेवण्यासाठी पोलीस दल कटिबद्ध आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत, तसेच नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत न घाबरता आणि विश्वासाने 'डायल ११२' या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg