पनवेल - तालुक्यातील मौजे भाताण येथे शासनाने ॲमिटी विद्यापीठासाठी १५ एकर आकारीपड जमीन देण्याचा घेतलेला निर्णय आता मोठ्या जनआंदोलनाची ठिणगी ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सदर निर्णयाची माहिती मिळताच सरपंच तानाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तात्काळ ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच दीपक ठाकूर, ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, अस्मिता काठवले, अरुणा गाताडे, रसिका भोईर यांच्यासह माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामसभेत ग्रामस्थांचा संताप अक्षरशः अनावर झालेला पाहायला मिळाला. ग्रामस्थांनी शासन आणि प्रशासनावर थेट आरोप करत “भूमिपुत्रांच्या हक्काची जमीन खासगी संस्थांच्या घशात घालण्याचा प्रकार आम्ही कदापिही सहन करणार नाही,” असा इशारा दिला. विशेष म्हणजे जरी सदर जमीन कागदोपत्री आकारीपड दाखवण्यात आली असली तरी अनेक शेतकरी वर्षानुवर्षे ती जमीन कसत असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचा मुद्दा ग्रामसभेत जोरदारपणे मांडण्यात आला.
सन २०२३ पासून गावठाण विस्तारासाठी जागा मिळावी म्हणून ग्रामपंचायतीमार्फत सातत्याने शासन दरबारी पत्रव्यवहार सुरू होता. वाढती लोकसंख्या, गावाचा विस्तार, सार्वजनिक सुविधा आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन जागा राखीव ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ग्रामस्थांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून खासगी विद्यापीठाला जमीन देण्याचा निर्णय घेतल्याने संतप्त ग्रामस्थांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ग्रामसभेमध्ये अनेक ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत “जर हा निर्णय तात्काळ रद्द झाला नाही, तर आगामी निवडणुकांमध्ये गावात कोणत्याही नेत्याला फिरू देणार नाही,” असा थेट इशारा दिला. तसेच शासन आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र लढा उभारण्यासाठी कोर कमिटी स्थापन करण्याचा निर्णयही ग्रामसभेत घेण्यात आला.
ही कोर कमिटी सर्व शासकीय कार्यालये, लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि संबंधित विभागांना लेखी निवेदने देणार असून आठ दिवसांच्या आत शासनाने निर्णय मागे घेतला नाही तर मोठ्या आंदोलनाची दिशा जाहीर केली जाणार असल्याचे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. “गावाच्या हक्काची जमीन वाचवा… भूमिपुत्रांच्या अस्तित्वाशी खेळ थांबवा!” अशा घोषणांनी संपूर्ण ग्रामसभा दणाणून गेली होती. भाताणमधील वाढता जनआक्रोश पाहता येत्या काळात हा प्रश्न राजकीयदृष्ट्या तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.