loader
Breaking News
Breaking News
Foto

जलसंधारण विभागाच्या चुकीमुळे ग्रामस्थांची वहिवाट बंद स्वातंत्र्य दिनी शिवतर- कोडबा धरणात जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा

ठाणे/ खेड (अमोल पवार) - सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या खेड तालुक्यातील शिवतर गावातील धरणाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या धरणाचे काम करीत असताना कामासाठी चुकीच्या पद्धतीने रस्त्याच्या खालील बाजूची माती काढण्यात आली आहे. त्यामुळे १४ जुलै, २०२४ रोजी शिवतर नामदरेवाडी रस्ता एका ठिकाणी खचला. वांरवार तक्रार केल्यानंतर देखील जलसंधारण विभाग व ठेकेदार यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे गुरुवार दिनांक १९ जून, २०२५ रोजी शिवतर नामदरेवाडी रस्ता पुन्हा दुसऱ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खचला आहे. २०२४ पासून या रस्त्यावरुन होणारी सर्वप्रकारची वाहतूक ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्णपणे बंद होती. हा रस्ता धोकादायक असल्याने पावसाळ्यात परिवहन सेवेनेही (एसटी) वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्याच्या धरणाकडील बाजूने जवळ-जवळ ७०० ते ८०० फूट लांबीची संरक्षक भिंत बांधणे अत्यंत गरजेचे असून या बाबत अनेकवेळा पत्रव्यवहार करूनही कार्यवाही होत नसल्याने संतप्त झालेल्या माजी सैनिकांसह ग्रामस्थांनी येत्या स्वातंत्र्य दिनी म्हणजेच १५ ऑगस्ट, २०२६ रोजी शिवतर-कोडबा धरणातच जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत राष्ट्रवादी (श. प.) चे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून उपायोजना करण्याचे आवाहन केले आहे. तर, या संदर्भात शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था, मुंबई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री संजय राठोड यांना निवेदनही दिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

महाराष्ट्र शासनाच्या जलसंधारण विभागाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील शिवतर गावात 'शिवतर कोडबा' हे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. या धरणाच्या मागील बाजूस जवळपास 70 ते 75 घरांची लोकवस्ती असलेली नामदरेवाडी आहे. या वाडीला जोडण्यासाठी शिवतर- दत्तवाडी ते नामदरे वाडी हा 2.175 किलोमीटर अंतराचा एकमेव रस्ता आहे. हा रस्ता बंद झाल्यास नामदरेवाडीचा जगाशी संपर्क तुटू शकतो, याची जाणीव असूनही धरणाचे बांधकाम करताना रस्त्याच्या खालील बाजुने अत्यंत चुकीच्या पद्धतीने मातीचे उत्खनन करण्यात आले. त्यामुळे १४ जुलै, २०२४ रोजी या रस्त्याचा काही भाग एका ठिकाणी वाहून गेला. ही बाब ग्रामस्थांनी लक्षात आणून दिल्यानंतर मे २०२५ मध्ये वर्षभरानंतर ढासळलेल्या ठिकाणी जुजबी दुरुस्ती काम करण्यात आले. त्यांनतर आधीच रस्ता वाहून गेल्याचा अनुभव गाठीशी असतानाही पुन्हा रस्त्याच्या खालील बाजुने गेले वर्षभर मातीचे उत्खनन करण्यात आले. त्यामुळे हा संपूर्ण रस्ताच आता धोकादायक झाला आहे. या परिसरात पावसाचे प्रमाण प्रचंड असल्याने डोंगरातून येणाऱ्या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जवळ-जवळ ७०० ते ८०० फूट लांबीचा रस्ता पुढील पाच वर्षांत टप्प्या-टप्प्याने पूर्णतः वाहून जाणार आहे. याची जिल्हा जलसंधारण अधिकारी, रत्नागिरी यांना पूर्ण कल्पना आहे. मात्र, त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्याची किंवा संरक्षक भिंत बांधण्याची मानसिकताच संबधितांची नसल्याचे दिसून येत असल्याने १५ ऑगस्ट रोजी जलसमाधी घेण्यात येणार आहे, असे शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था, मुंबईचे सचिव सुनिल मोरे यांनी सांगितले.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, शिवतर गावाचा परिसर वनराईने वेढलेला असल्याने येथे सर्पदंशासारख्या घटना घडल्यास रूग्णांना तसेच गर्भवती महिलांना वाहन उपलब्ध होणे अशक्यप्राय होणार आहे. परिणामी रूग्णांना डोलीचा आधार घ्यावा लागणार असून त्यातून एखादी अप्रिय घटना घडल्यास त्याची जबाबदारी अप्पर आयुक्त तथा मुख्य अभियंता, मृद व जल संधारण विभाग यांची असेल, असे शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्थेचे सचिव सुनील मोरे यांनी म्हटले आहे. यासंदर्भात आपण मृद व जलसंधारण विभाग, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, रत्नागिरी यांच्याशी पत्रव्यवहार केला असून मृद व जलसंधारणामार्फत माती काढण्यात आलेल्या रस्त्याच्या खालील बाजुने संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय न-झाल्यास येत्या 15 ऑगस्ट, 2026 रोजी स्वातंत्र्यदिनी जलसमाधी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा सुनिल मोरे यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg