loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्याला आपण 'कचरा' समजतो, त्यातून ब्राझीलने सोनं कसं कमावलं? कोकणासाठी एक धडा!

देवळे (प्रकाश चाळके) - कोकणात आपण १ किलो काजू मिळवण्यासाठी तब्बल ६ ते ८ किलो जीवनसत्त्वांनी भरपूर असलेली रसाळ 'काजू बोंडं' रानावनात कुजायला सोडतो. आपण फक्त काजूच्या बीचा विचार केला, पण फळाकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष केलं. काजूचे मूळ स्थान असलेल्या ब्राझीलने हा कृषी 'बाय-प्रोडक्ट' एका मुख्य संपत्तीसारखा कसा वापरावा, याची यशोगाथाच जगासमोर ठेवली आहे. कोकणात काजू बोंडं हा फेकून दिला जातो, पण ब्राझीलने मात्र यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल करणारा उद्योग उभा केला आहे. ब्राझीलमधील शेतकरी काजू बोंडं नुसती झाड हलवून पाडत नाहीत. ते अत्यंत कौशल्याने हाताने किंवा विशेष उपकरणांनी ही फळं काढतात जेणेकरून ती जमिनीला स्पर्श करणार नाहीत. आपण कोकणात जसा हापूस आंबा जपून हाताळतो आणि पेटीत भरतो, अगदी तशीच ही बोंडं मऊ गादी असलेल्या क्रेट्समध्ये साठवून वाहतूक केली जातात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ब्राझीलमधील काजू बोंडांचा 'काजुईना' हा रस केवळ एक पेय नसून तो तिथला सांस्कृतिक वारसा आहे. दरवर्षी तिथे ४०,००० टनांहून अधिक काजू रसाचे उत्पादन घेतले जाते. बोंडांमधील फायबरचा वापर करून शाकाहारी 'बर्गर पॅटी' आणि चिकनसारखी चव देणारे पदार्थ बनवले जातात. काजू बोंडांपासून उच्च दर्जाची जाम, कँडी आणि वाळवलेली फळं बनवली जातात ज्याला मोठी मागणी आहे. केवळ काजू बोंडांच्या उत्पादनातून ब्राझील वर्षाला साधारण ४२ कोटी हून अधिक परकीय चलन कमावतो. कोकणात राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे आपल्याला पुढची 'मुंबई' किंवा 'पुणे' होण्याकडे ढकललं जातंय. सिमेंटची जंगलं आणि औद्योगिक वसाहतींच्या नावाखाली आपल्या कोकणची जैवविविधता आणि शांतता धोक्यात येत आहे. खरा विकास म्हणजे आपली लाल माती डांबराखाली गाडणे नव्हे, तर आपल्या मातीत जे पिकतंय त्याची ताकद ओळखणे होय. जर आपण हापूस आंबा हाताळण्याचे आपले कसब काजू बोंडांसाठी वापरले, तर आपण केवळ 'शेतकरी' राहणार नाही, तर एका नव्या 'इको-औद्योगिक क्रांती'चे नायक बनू.

टाईम्स स्पेशल

टांझानिया आणि व्हिएतनाम हे देश काजू बोंडांच्या चोथ्यापासून उच्च प्रथिनयुक्त पशुखाद्य तयार करत आहेत, ज्यामुळे त्यांना बाहेरून महागडे धान्य आयात करावे लागत नाही. व्हिटॅमिन-C चा राजा काजू बोंडाच्या एका ग्लास रसामध्ये संत्र्यापेक्षा ५ पटीने जास्त व्हिटॅमिन-सी असते. जग आज नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्तीच्या मागे धावत असताना, आपण मात्र आरोग्याचा हा खजिना फुकट घालवत आहोत. बाहेरच्या शक्तींनी येऊन आपला निसर्ग बदलण्याची वाट पाहायची, की आपल्या 'गावकीच्या ज्ञानाचा' वापर करून जागतिक बाजारपेठ बदलायची? आता वेळ आली आहे 'कचरा' नाही, तर 'संपत्ती' पाहण्याची!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg