loader
Breaking News
Breaking News
Foto

​आखाती युद्धाचे सावट; सिंधुदुर्गात इंधन टंचाईच्या भीतीने पेट्रोल पंप, गॅस एजन्सीसमोर रांगा

​सावंतवाडी (अभिमन्यू लोंढे) - आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचे चटके आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावामुळे इंधन टंचाई निर्माण होईल, अशी भीती व्यक्त केली जात असल्याने जिल्ह्यातील पेट्रोल पंप आणि गॅस एजन्सी कार्यालयासमोर ग्राहकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. विशेषतः औद्योगिक गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने जिल्ह्यातील हॉटेल व्यवसायाला मोठी खिळ बसली असून, तातडीने आपत्कालीन व्यवस्थापनाची गरज निर्माण झाली आहे. ​गेल्या दोन दिवसांपासून इंधन टंचाई निर्माण होणार असल्याची चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आखाती युद्धाच्या प्रसंगावर देशाला काटकसरीने वागण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे पुन्हा एकदा 'कोरोना' काळासारखी परिस्थिती ओढवते की काय, या भीतीने इंधन मिळवण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. येत्या काही दिवसांत घरगुती आणि औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत झाला नाही, तर याचे गंभीर परिणाम सर्वसामान्य जनतेवर होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात औद्योगिक गॅस पुरवठा विस्कळीत झाल्याचा मोठा परिणाम हॉटेल व्यवसायावर झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे तीन हजार हॉटेल व्यावसायिक सध्या तारेवरची कसरत करत आहेत. अनेक ठिकाणी गॅसअभावी 'ओपन ओटे' असलेल्या हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक करून पर्यटकांची सोय केली जात आहे. गॅस उपलब्ध नसल्याने अनेक हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या 'मेन्यू कार्ड'मध्ये बदल केला असून, काही विशिष्ट पदार्थ देण्यास असमर्थता दर्शविली आहे. चपाती, भाकरी यांसारख्या पदार्थांसाठी 'आउटसोर्सिंग'चा (बाहेरून बनवून घेणे) पर्याय निवडला जात आहे. ​काही व्यावसायिकांनी इलेक्ट्रिक शेगड्यांचा पर्याय स्वीकारला आहे, मात्र त्यासाठी जाणकार वीज तंत्रज्ञ उपलब्ध ठेवावे लागत आहेत. वीज वापरामुळे जेवणाचा खर्च वाढत असल्याने हॉटेलमधील पदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. याचा सर्वाधिक फटका छोट्या वडापाव गाड्या आणि टपरीधारकांना बसत असून त्यांचे व्यवसाय अडचणीत सापडले आहेत.

टाईम्स स्पेशल

या गंभीर परिस्थितीबाबत सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी व हॉटेल व्यावसायिक नितीन वाळके यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "औद्योगिक गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आम्ही मुख्यमंत्री आणि पालकमंत्री नितेश राणे यांना निवेदन दिले आहे. पालकमंत्र्यांनी यावर एक समितीही स्थापन केली आहे. जर हा तुटवडा वेळीच सुटला नाही, तर जिल्ह्यातील ७० टक्के हॉटेल व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका बसेल. प्रशासनाने यावर तातडीने मार्ग काढावा, जेणेकरून पर्यटन आणि रोजगारावर परिणाम होणार नाही. दोन महिन्यांचा पर्यटन हंगाम आहे." दरम्यान जिल्हा प्रशासनाने अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन केले आहे. जिल्हाधिकारी तृप्ती घोडमिसे यांनी देखील तसे जनतेला आवाहन केले आहे. मात्र गॅस एजन्सी कार्यालय व पेट्रोल पंपावरील गर्दी वाढत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg