loader
Breaking News
Breaking News
Foto

पाडलोस केणीवाड्यात भीषण आग

बांदा (प्रतिनिधी) - पाडलोस-केणीवाडा परिसरात रविवारी दुपारी लागलेल्या भीषण आगीत सुमारे १० एकर काजू बागायतीसह आंबा व रानटी झाडांचे मोठे नुकसान झाले. वाऱ्याच्या जोरामुळे आगीने रौद्ररूप धारण करत शेजारील बागांपर्यंत फैलाव केला असून शेतकऱ्यांचे अंदाजे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावातील केणीवाडा परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून मोठी हानी झाली. उन्हाळ्याच्या तीव्र उकाड्यामुळे बागायतीतील गवत पूर्णपणे कोरडे झाले होते. त्यातच दुपारच्या वेळी वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीने अल्पावधीतच रौद्ररूप धारण केले आणि ती वेगाने पसरत गेली. सुरुवातीला एका भागापुरती मर्यादित असलेली आग काही वेळातच रस्ता ओलांडून साळगावकर यांच्या बागेत पोहोचली. परिणामी एकूण सुमारे १० एकर क्षेत्रातील काजू बागायती, आंब्याची झाडे तसेच रानटी झाडे जळून खाक झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काजू हंगामाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने बागायतदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, आग विझविण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने प्रयत्न केले. पाडलोस सोसायटीचे व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य गणपत पराडकर यांच्यासह शंकर कोरगावकर, अमोल नाईक, ज्ञानदीप मयेकर, अक्षय कदम, आनंद कोरगावकर, गोविंद पराडकर, वामन केणी, कार्तिक पराडकर, प्रशांत नाईक, प्रतीक्षा नाईक, विलासिनी नाईक, कमल पराडकर, भालचंद्र कदम, अंकुश नाईक, साईश नाईक, शिवराम कदम, वैभव नाईक, प्रतिभा केणी आदी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांच्या प्रयत्नांनंतरही आगीची तीव्रता लक्षात घेता मोठे नुकसान टाळता आले नाही. संबंधित प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

टाईम्स स्पेशल

आगीच्या ज्वाला तब्बल १० ते १२ फूट उंच उसळत असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. आगीची तीव्रता आणि वेग लक्षात घेता ती नियंत्रणात आणणे अत्यंत कठीण ठरत होते. धुराचे लोट आणि उष्णतेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या आगीत नाईक, साळगावकर, कोरगावकर आणि केणी या सामायिक जमीन असलेल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ५ ते ६ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र अधिकृत पंचनामा अद्याप झालेला नसल्याने नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट झालेला नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg