loader
Breaking News
Breaking News
Foto

शिरवणे गावातील युवा शेतकरी आदित्य खोत यांच्या सेंद्रिय शेती बागेला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट

दापोली (वार्ताहर) : कोकणातील पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत प्रगत शेतीचा आदर्श निर्माण करणारे शिरवणे गावातील युवा शेतकरी आदित्य खोत यांची सेंद्रिय शेती सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यांच्या बागेला नुकतीच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सविस्तर पाहणी केली असून त्यांच्या प्रयोगशील शेतीचे विशेष कौतुक करण्यात आले. या पाहणी वेळी मंडळ कृषी अधिकारी नागेश तावसकर, सहाय्यक कृषी अधिकारी विरेंद्र चकोर तसेच उप कृषी अधिकारी संतोष मांडवकर उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी खोत यांच्या आंबा, काजू, नारळ, सुपारी व काळीमिरी बागांची पाहणी करून त्यांच्या शास्त्रीय शेती पद्धतीचे कौतुक केले. आदित्य खोत यांच्या शेतीत आंबा हे प्रमुख पीक असून सेंद्रिय पद्धतीने घेतलेले उत्पादन हे त्यांच्या शेतीचे वैशिष्ट्य ठरत आहे. झाडांची निगा, सेंद्रिय खतांचा वापर, पाण्याचे अचूक नियोजन आणि वेळेवर केली जाणारी शेतीकामे यामुळे बागेची उत्पादकता लक्षणीय वाढल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी त्यांनी सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या आंबा उत्पादनाची माहिती घेण्यासाठी कृषी विभागाच्या सुमारे ४० जणांच्या पथकाने त्यांच्या बागेला भेट दिली होती. यामध्ये कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे विस्तार शिक्षण विभागाचे प्रमुख डॉ संतोष वरवडेकर, डॉ. मकरंद जोशी, डॉ पराग हळदणकर आदी प्रमुख व्यक्तींचा यामध्ये समावेश होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खोत हे “राजलक्ष्मी हापूस आंबा” या नावाने स्वतःच प्रायव्हेट मार्केटिंगद्वारे आंब्याची विक्री करतात. दर्जा आणि विश्वासार्हता यामुळे त्यांच्या आंब्याला ग्राहकांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून पुणे, मुंबई, ठाणे, सातारा, कराड यांसह गुजरात, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि गोवा या राज्यांतही त्यांच्या आंब्याला मागणी आहे. ग्राहकांपर्यंत थेट पोहोचण्याची त्यांची पद्धत इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. उर्वरित आंब्यावर प्रक्रिया करून विविध उत्पादने तयार करण्याचा त्यांनी यशस्वी प्रयोग केला आहे. या मूल्यवर्धनामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळत असून शेती अधिक शाश्वत आणि नफ्याची बनत असल्याचे त्यांनी सांगितले. सुमारे २० एकर क्षेत्रावर विविध पिकांची शेती करणारे खोत आंब्यासोबत काजू, नारळ, सुपारी, काळीमिरी तसेच भाताची लागवड करतात. सुपारीवर काळीमिरीची लागवड करून त्यांनी आंतरपीक पद्धतीचा प्रभावी वापर केला असून यंदा काळीमिरीचे उत्पादन वाढून चांगला दर मिळाल्याचे दिसून आले. तसेच 'विश्वमेघ' या नावाने स्वतःची गोशाळा चालवत आहेत. यामध्ये २५ गोवंश असून त्यांचेपासून दुग्ध व्यवसाय करीत आहेत. याशिवाय गोमूत्र शेण याचा वापर शेतीसाठी करतात त्यामुळे शेंद्रीय शेती उत्तम केली जाते. शेतीत ऊर्जा बचतीसाठी त्यांनी गोबर गॅस प्रकल्प उभारला असून पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक व तुषार सिंचनाचा वापर केला आहे. तसेच पावसाचे पाणी साठवण्यासाठी जलकुंडे तयार करून पाण्याचा कार्यक्षम वापर केला जात आहे.

टाईम्स स्पेशल

गावातील जलसंधारणासाठी त्यांनी “पाणी अडवा – पाणी जिरवा” उपक्रम राबवून नदीवर बंधारे घातले आहेत. या उपक्रमामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत होत असून शेतीसाठी आवश्यक पाण्याची उपलब्धता सुधारत असल्याचे सांगण्यात आले. नवीन लागवडीसाठी लागणारी रोपे ते स्वतःच्या नर्सरीमध्ये तयार करतात. ही रोपे स्वतःच्या शेतीत वापरण्यासोबतच इतर शेतकऱ्यांनाही उपलब्ध करून देतात. तसेच आधुनिक व सेंद्रिय शेतीबाबत गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करतात. दरम्यान, शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर या कार्यशाळेत सहभागी होत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास केला आहे. पारंपरिक सेंद्रिय शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या शेतीतील नियोजन, पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय पद्धती, थेट विक्री आणि मूल्यवर्धन याचे विशेष कौतुक केले. त्यांच्या या प्रगत शेतीमुळे शिरवणे व परिसरातील शेतकऱ्यांना नवी दिशा मिळत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यासोबतच खोत हे शेतकऱ्यांना Farmer ID नोंदणी, Mahavistar AI App, ई-पीक पाहणी तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन करत असून परिसरातील शेतकरी डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती अधिक प्रगत करण्याच्या दिशेने पुढे येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg