loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाच्या ८१ लाखांच्या खर्चावर प्रश्नचिन्ह; सखोल चौकशीची मागणी

​रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात विविध योजनांच्या नावाखाली तब्बल ८१ लाख ६९ हजार ४५९ रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, कागदोपत्री दाखवण्यात आलेला हा अवाढव्य खर्च प्रत्यक्षात कोठे आणि कसा झाला, याबाबत आता संशयाचे वातावरण निर्माण झाले असून या सर्व खर्चाची सखोल चौकशी करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पशुसंवर्धन विभागाने वर्षभरात विविध उपक्रम राबवल्याचा दावा केला आहे. यामध्ये सर्वाधिक खर्च सुधारित जातीच्या म्हशींच्या पुरवठ्यावर करण्यात आला असून, त्यासाठी २४ लाख ८५ हजार रुपये खर्च झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच साथरोग निर्मूलन योजनेसाठी १७ लाख ९९ हजार ९४५ रुपये आणि गोचीड निर्मूलनासारख्या कामासाठी ९ लाख ९९ हजार ६२५ रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, केवळ प्रसिद्धी आणि प्रचारासाठी १ लाख ९९ हजार ६१५ रुपये खर्च करण्यात आले आहेत. ​इतर खर्चांमध्ये पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या दुरुस्तीसाठी ५४ हजार ७७२ रुपये, दवाखान्यात आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी ७ लाख रुपये, तर स्वच्छ गोठ्यांच्या योजनेसाठी ४९ हजार ७०० रुपयांचा समावेश आहे. दुग्ध व्यवसाय आणि शेळीपालन प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शकांवर १ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. ५० टक्के अनुदानावर केल्या जाणाऱ्या शेळी वाटप योजनेसाठी ९ लाख ८८ हजार रुपये खर्च झाले असून लाभार्थ्यांना त्याचे वाटप केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

टाईम्स स्पेशल

​मात्र, ग्रामीण भागातील पशुपालकांची स्थिती आणि प्रत्यक्षात जमिनीवर दिसणारी आकडेवारी यात मोठी तफावत असल्याचे बोलले जात आहे. अनेक ठिकाणी दवाखान्यांची अवस्था अद्यापही दयनीय आहे, तर दुर्गम भागातील शेतकऱ्यांपर्यंत या योजनांचे लाभ खरोखर पोहोचले का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. लाखो रुपये खर्च होऊनही पशुपालकांच्या समस्या कायम असल्याने, हा निधी केवळ कागदोपत्री तर खर्च पडला नाही ना, अशी शंका घेतली जात आहे. सरकारी तिजोरीतून खर्च झालेला हा ८१ लाखांचा आकडा आणि लाभार्थ्यांची प्रत्यक्ष संख्या यांची पडताळणी झाल्यास अनेक बाबी स्पष्ट होऊ शकतात. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून पारदर्शकता आणावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg