loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी पं. स. च्या अर्थसंकल्पात मोठी कपात; लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता येताच निधीला कात्री

रत्नागिरी: रत्नागिरी पंचायत समितीच्या गेल्या दोन वर्षांतील अर्थसंकल्पीय तरतुदींवर नजर टाकल्यास प्रशासकीय राजवट आणि लोकशाही राजवट यांच्यातील निधी वाटपात मोठी तफावत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, ज्यावेळी प्रशासक राजवट होती, तेव्हा अर्थसंकल्पाचा आकडा मोठा होता, मात्र निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींच्या हाती सत्ता येताच प्रशासनाने तरतुदी चक्क निम्म्यावर आणल्याने तालुक्यात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात पंचायत समितीवर प्रशासकांचे नियंत्रण होते. त्यावेळी प्रशासनाने ४ कोटी ७० लाखांचे भरीव अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र, २०२५-२६ या आर्थिक वर्षात निवडणुका होऊन लोकप्रतिनिधींचे मंडळ अस्तित्वात आल्यानंतर, प्रशासनाने तयार केलेले बजेट केवळ दोन कोटींच्या घरात मर्यादित ठेवले आहे. यामुळे 'लोकप्रतिनिधींच्या अधिकारात कपात की प्रशासकीय उदासिनता?' असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विविध विभागांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास ही तफावत स्पष्टपणे जाणवते. सर्वाधिक फटका बांधकाम विभागाला बसला असून, गेल्या वर्षीची १ कोटी २७ लाख ९७ हजारांची तरतूद यंदा थेट ४२ लाखांवर आली आहे. आरोग्य विभागाची अवस्था तर अत्यंत बिकट असून, ७१ लाख ७८ हजारांवरून ही तरतूद केवळ १० लाखांवर आणली गेली आहे. ग्रामीण भागातील आरोग्याचा प्रश्न गंभीर असताना ही कपात कशासाठी, असा सवाल विचारला जात आहे. समाजकल्याण विभागातही हीच परिस्थिती आहे. गेल्या वर्षी १ कोटी २१ लाखांची तरतूद होती, ज्यात दिव्यांगांसाठी १४ लाखांचा समावेश होता. या निधीतून दिव्यांगांना नेमके काय लाभ मिळाले, याची चौकशी होणे गरजेचे असतानाच, यंदाच्या तरतुदींना मात्र कात्री लावण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विभागाचे बजेट ३७ लाखांवरून २० लाखांवर, तर शिक्षण विभागाचे ५३ लाखांचे बजेट २५ लाखांवर आले आहे.

टाईम्स स्पेशल

केवळ सामान्य प्रशासन विभागाच्या निधीत १० लाखांची वाढ (४० लाखांवरून ५० लाख) करण्यात आली आहे. शेतीसाठी दोन्ही वर्षी १० लाखांची समान तरतूद असली तरी, संकीर्ण खर्चाच्या हेडखालील निधी १४ लाखांवरून ५ लाखांवर आणला आहे. प्रशासक असताना निधी उपलब्ध होणे शक्य होते, तर लोकप्रतिनिधी आल्यावरच हा निधी निम्म्यावर का आला? प्रशासनाने हा निधी नेमका कोणत्या आधारावर कमी केला, याबाबत आता तालुक्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली असून अधिकाऱ्यांच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg