loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलादपूर तालुक्यातील कर्तव्यदक्ष जवानाचा ड्युटीवर जातानाच करुण अंत

पोलादपूर (धनराज गोपाळ) - देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर तैनात असलेला एक कर्तव्यदक्ष जवान सुट्टी संपवून ड्युटीवर परतत असताना वाटेतच त्याचा संशयास्पद अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कणगुले गावचे सुपुत्र सध्या राहणार तळेगाव दाभाडे पुणे येथील रहिवासी आणि मागील २४ वर्षांपासून CRPF मध्ये सेवा बजावणारे जवान प्रशांत प्रकाश कदम (वय ४२) यांचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, हा केवळ अपघात नसून तो एक नियोजनबद्ध घातपात असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलीस तपासावर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्च रोजी संध्याकाळी प्रशांत कदम हे आपल्या घरून गुजरातच्या गांधीनगरकडे ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. लोणावळ्यापर्यंत पोहोचल्याचा त्यांनी घरच्यांना फोन केला, मात्र त्यानंतर अचानक त्यांचा संपर्क तुटला आणि त्यांचा मोबाईलही बंद झाला. २७ मार्चला गांधीनगर कार्यालयातून ते ड्युटीवर पोहोचले नसल्याचा निरोप आला आणि कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. यानंतर सुरू झाला तो एका जवानाच्या शोधाचा थरार. ३० मार्च रोजी एका मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मार्चलाच सोमाटणे फाटा येथील हॉटेल 'अंगण' समोर प्रशांत कदम हे जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.

टाइम्स स्पेशल

या घटनेनंतर प्रशांत कदम यांचे पार्थिव त्यांच्या तळेगाव दाभाडे येथील घरी आणण्यात आले. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते. ग्रामस्थांच्या उपस्थितीत पोलीस दलाच्या वतीने हवेत गोळ्या झाडून त्यांना शासकीय इतमामात अखेरची सलामी देण्यात आली. जवानाला निरोप देताना संपूर्ण गाव शोकसागरात बुडाले होते, मात्र या निरोपासोबतच न्यायाची मागणी जोर धरू लागली आहे. हा मृत्यू अपघाती असल्याचे दर्शवले जात असले तरी कुटुंबाने उपस्थित केलेले मुद्दे या प्रकरणाला गंभीर वळण देत आहेत. ड्युटीवर जाणाऱ्या जवानाचा मोबाईल, ऑफिसचे ओळखपत्र आणि गणवेश असलेली बॅग अजूनही बेपत्ता आहे, मग हा अपघात कसा असू शकतो? असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्यातच शवविच्छेदन अहवालात त्यांच्या पोटाला झालेला मुका मार आणि मानेजवळ असलेली गंभीर जखम यामुळे घातपाताची शक्यता बळावली आहे. २५ मार्चला मृतदेह सापडूनही पोलिसांनी तात्काळ ओळख पटवण्यात दिरंगाई का केली, असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे. "आमचा मुलगा शहीद झाला की मारला गेला?" असा आर्त टाहो फोडत कदम कुटुंबाने वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे सखोल तपासाची आणि न्यायाची मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg