loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत अखेरच्या दिवशी निधीची प्रतीक्षा; बांधकाम विभागाचे ठेकेदार धास्तावले

रत्नागिरी :​आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या समाप्तीला आता केवळ काही तास उरले असताना, रत्नागिरी जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदारांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. मंगळवार, ३१ मार्च रोजी महावीर जयंतीची सार्वजनिक सुट्टी असल्याने सोमवार, ३० मार्च हाच या आर्थिक वर्षातील कामकाजाचा शेवटचा दिवस ठरला आहे. यामुळेच वर्षभरात केलेल्या विकासकामांचा हक्काचा निधी सोमवारी तरी तिजोरीत जमा होणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. ​रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांची अनेक कामे वर्षभरात पूर्ण झाली आहेत. मात्र, या कामांची बिले अद्याप लटकलेलीच आहेत. जिल्ह्याला वर्षभराच्या कामांसाठी ज्या प्रमाणात निधीची अपेक्षा होती, त्या तुलनेत आतापर्यंत केवळ पाच कोटी रुपयांचा किरकोळ निधी प्राप्त झाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

विशेषतः राज्य शासनाच्या ५०-५४ या देखभाल व दुरुस्तीच्या लेखाशीर्षांतर्गत (हेड) '०३-०४' रस्ते व पूल बांधकामासाठी सुमारे १३० कोटी रुपयांच्या निधीची तातडीची आवश्यकता आहे. मात्र, वर्षाचा शेवटचा दिवस उजाडला तरी या हेडखाली अद्याप एकही रुपया उपलब्ध झालेला नाही. यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून स्वतःच्या खिशातून पैसे लावून कामे पूर्ण करणाऱ्या ठेकेदारांची अवस्था बिकट झाली आहे. ​या आर्थिक पेचप्रसंगाचे पडसाद सोमवारी सकाळपासूनच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी कार्यालय उघडल्यापासूनच रत्नागिरीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाबाहेर ठेकेदारांची मोठी गर्दी होण्याची चिन्हे आहेत. २९ मार्च रोजी रविवार असल्याने बँकिंग व्यवहार आणि सरकारी निधी हस्तांतरण (निधी वर्ग करणे) प्रक्रिया बंद होती, त्यामुळे सोमवारच्या दिवसावरच सर्वांच्या आशा टिकून आहेत. राज्य सरकारवर असलेला कर्जाचा मोठा बोजा आणि 'लाडकी बहीण' सारख्या महत्त्वाकांक्षी सामाजिक योजनांवर होणारा मोठा खर्च, यामुळे विकासकामांच्या निधीला कात्री लागल्याची चर्चा कंत्राटदारांमध्ये सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

​जर सोमवारी रात्रीपर्यंत शासनाकडून निधी वितरित झाला नाही, तर ठेकेदारांची कोट्यवधींची बिले 'लॅप्स' होण्याची किंवा पुढील आर्थिक वर्षापर्यंत लांबणीवर पडण्याची भीती आहे. कामे पूर्ण होऊनही हातात पैसा येत नसल्याने कामगारांचे पगार आणि साहित्याचे देणे कसे द्यायचे, असा यक्षप्रश्न ठेकेदारांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे सोमवारी संध्याकाळपर्यंत मंत्रालयातून रत्नागिरीसाठी निधीची किती तरतूद होते, यावरच अनेक विकासकामांचे आणि ठेकेदारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg