loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटेतील लक्ष्मी ऑरगॅनिकविरोधात धडक मोर्चा; ७५ दिवसांच्या आंदोलनाला उग्र वळण हजारोंच्या संख्येने आंदोलकांची उपस्थिती

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - खेड लोटे येथील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता सोमवारी अधिक वाढली. गेल्या तब्बल ७५ दिवसांपासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती यांच्या वतीने कंपनीविरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात लोटे पंचक्रोशीसह चिपळूण व खेड तालुक्यातील ग्रामस्थ, महिला आणि माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोर्चाची सुरुवात मुंबई-गोवा महामार्गावरील एक्सेल फाटा येथून झाली. सकाळी १० वाजल्यापासून आंदोलक जमा होण्यास सुरुवात झाली होती. आंदोलनकर्त्यांनी कंपनीविरोधातील नाराजी तीव्र शब्दांत व्यक्त करत स्थानिक प्रशासन आणि शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचा हेतू स्पष्ट करत सांगितले की, अशोक जाधव आणि राजेंद्र आंब्रे हे गेल्या ७५ दिवसांपासून कंपनीविरोधात उपोषणाला बसले असूनही स्थानिक प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची पुरेशी दखल घेतलेली नाही. पीएफएएस (PFAS) चे उत्पादन करणारी ही कंपनी आंदोलकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनीकडून घातक रसायनांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. कंपनीचे सांडपाणी टँकरद्वारे सीईटीपीकडे पाठवले जाते, मात्र जगबुडीवर नदी परिसरात याच कंपनीच्या टँकरचा अपघात झाल्याने घातक रसायनांच्या सुरक्षित व्यवस्थापनाबाबत गंभीर शंका निर्माण झाल्याचा दावा आंदोलकांनी केली. “मानवी जीवनावर विपरीत परिणाम करणारी ही कंपनी कोकणातून हद्दपार करावी,” अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली. स्थानिकांच्या आरोग्यास धोकादायक ठरणाऱ्या या उद्योगाविरोधात राजकीय नेतेही मौन बाळगत आहेत, असा आरोपही करण्यात आला. पीएफएएस संदर्भात देशात ठोस कायदे नसल्याचा फायदा घेत काही अटींसह कंपनीला मान्यता देण्यात आली, असा दावा करत यासंदर्भात कडक कायदे करून कंपनी तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी समितीचे उदय घाग, अशोक जाधव, राजेंद्र आंब्रे, मनसेचे पदाधिकारी, काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग, तसेच आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांनी मनोगते व्यक्त केली. मोर्चानंतर समितीच्या वतीने जिल्हा प्रशासन आणि पोलिस अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात उपस्थित केलेल्या प्रश्नांची २० दिवसांत लेखी माहिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मोर्चा शांततेत पार पडला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या वतीने उत्पादन विभागाचे उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी आंदोलनकर्त्यांच्या भावना समजून घेत असल्याचे सांगितले. त्यांनी म्हटले की, “आंदोलकांच्या भावनांची आम्ही कदर करतो. त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे लवकरच दिली जातील. यापूर्वी आंदोलकांनी दोन वेळा दिलेल्या निवेदनांनाही उत्तर देण्यात आले आहे.” ते पुढे म्हणाले, “फक्त येथेच पीएफएएस घटक असलेले उत्पादन होत नाही. भारतात जवळपास ५५ हजार मेट्रिक टन या घटकाचे उत्पादन होत आहे. दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तूंमध्ये पीएफएएसचा वापर केला जातो. याबाबत लोकांमध्ये गैरसमज आहे. तो दूर करण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत जाऊन जनजागृती करत आहोत आणि पुढेही ते सुरू राहील.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg