loader
Breaking News
Breaking News
Foto

वयोवृद्ध महिलेचा मृत्यू नैसर्गिक; मात्र गळ्यातील सोन्याची बोरमाळ गायब, पोलिसांचा तपास सुरू

दापोली (प्रतिनिधी) - करंजाणी दर्भाची वाडी येथील ८१ वर्षीय सुलोचना श्रीपत साळवी यांच्या मृत्यूने परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद असल्याची चर्चा गावात आणि परिसरात रंगली होती. गळ्यातील सोन्याची बोरमाळ गायब असल्याने घातपाताचा संशयही व्यक्त केला जात होता. मात्र शवविच्छेदन अहवालात मृत्यू नैसर्गिक असल्याचे स्पष्ट झाल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. दापोली तालुक्यातील करंजाणी दर्भाची वाडी येथे आपल्या राहत्या घरी सुलोचना श्रीपत साळवी या एकट्याच राहत होत्या. सकाळी उशिरापर्यंत त्या उठल्या नाहीत. म्हणून त्यांच्या शेजारी राहणार्‍यांनी जाऊन पाहिले तर राहते घराचे पडवीचे बेडरुममध्ये बेडवर मानेपर्यंत ब्लॅकेट अंगावर घेवुन साळवी उताण्या स्थितीत पडलेल्या आढळून आल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांच्या शरीराची कोणत्याही प्रकारची हालचाल दिसुन आली नाही त्यामुळे या घटनेची माहिती दापोली पोलिसांना त्यांनी दिली. माहिती मिळताच दापोली पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेश तोरसकर हे आपल्या पोलिस सहकार्‍यांसह तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा करत घटनेचा तपासही सुरू केला. प्रारंभी पोलिसांनी घातपाताच्या दृष्टीने तपास केला होता. घरातील इतर मौल्यवान वस्तू तसेच त्यांच्याकडे ठेवण्यात आलेले देवाचे १३ तोळ्याचे सोन्याचे दागिने सुरक्षित आढळून आलेले आहेत. मात्र साळवी यांच्या गळ्यातील सोन्याची बोरमाळ गायब असल्याचे लक्षात येताच संशय अधिक गडद झाला. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने घातपात झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी साळवी यांच्या गळ्यात मृत्यू समयी नक्की बोरमाळ होती किंवा कसे याबतची स्पष्टता होत नसल्याने याबाबतची सविस्तर माहिती घेण्याचे काम सुरू आहे.

टाईम्स स्पेशल

त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक महामुनी तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश सणस यांनीही घटनास्थळी भेट देत तपास कामासंदर्भात योग्य त्या सुचना त्यांनी दापोली पोलिसांना केल्या आहेत. दरम्यान वैद्यकीय अहवालात झालेला मृत्यू हा नैसर्गिक झाला असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा बदलली आहे. तरीही गळ्यातील बोरमाळ गायब असल्यामुळे चोरीचा मुद्दा कायम असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू ठेवला आहे. या घटनेचा अधिक तपास पीएसआय महेश पाटील यांच्याकडे देण्यात आला असून त्यांनी पुढील तपास त्यांनी सुरू केला आहे. या प्रकरणामुळे करंजाणी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, गळ्यातील बोरमाळ शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असले तरी नैसर्गिक मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल मिळाल्याने बोरमाळेचे गुढ मात्र वाढले आहे. मात्र दापोली पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर यांची गुन्हा उकल करण्याची एकुणच पोलिस खात्यातील यशस्वी कामगिरी पाहता व्यक्त होणार्‍या शंकेचे निरसन आणि निराकरण करण्यास ते नक्कीच यशस्वी होतील, अशा प्रकारची आशा व्यक्त होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg