loader
Breaking News
Breaking News
Foto

शासनाचे उदासीन धोरण कोकणात नक्षलवादाला खतपाणी घालणारे; शेतकरी नेते विलास सावंत यांचा इशारा

बांदा (प्रतिनिधी) - गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या न्याय्य हक्कासाठी सनदशीर मार्गाने लढणाऱ्या कोकणच्या शेतकऱ्यांकडे शासन सातत्याने दुर्लक्ष करत आहे. केवळ 'मलमपट्टी' स्वरूपातील घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असून, या विदारक परिस्थितीमुळे संतप्त झालेला जिल्ह्यातील युवक भविष्यात बंडाची भाषा करत आहे. शासनाच्या याच चुकीच्या कृषी धोरणामुळे भविष्यात कोकणात नक्षलवाद फोफावण्याची दाट शक्यता आहे, असा गंभीर इशारा शेतकरी नेते विलास सावंत यांनी दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या मांडताना सावंत म्हणाले की, १२ मार्च रोजी शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी नुकसान भरपाईचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात शासनाने प्रति हेक्टरी केवळ २२ हजार रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली. "विमा कंपन्या जिथे १ लाख ७० हजारांपर्यंत भरपाई देतात, तिथे शासन कोणत्या निकषावर ही किरकोळ मदत देत आहे?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सावंत म्हणाले की, उद्योजकांनी मागणी न करताही त्यांचे १६.५ लाख कोटींचे कर्ज 'राईट ऑफ' केले जाते, तर हमीभावासाठी लढणाऱ्या शेतकऱ्यांना 'दहशतवादी' ठरवले जाते. आधीच सधन असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांचे लाड पुरवण्यासाठी आठवा वेतन आयोग लागू केला जातो, मात्र जगाच्या पोशिंद्याला वाऱ्यावर सोडले जाते. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात मंजूर झालेले २०० कोटी रुपये खर्च करण्यात काजू बोर्डाला अपयश आले आहे. बोर्डाचे नेतृत्व शेतकऱ्यांऐवजी कारखानदारांचे हित जोपासण्यात धन्यता मानत आहे.

टाईम्स स्पेशल

माजी कृषिमंत्री शरद पवार यांच्या धोरणांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, आधी बाजारपेठ आणि मग उत्पादन वाढीवर भर देणे आवश्यक आहे. केवळ 'एआय' (AI) तंत्रज्ञान आणून उत्पादन वाढेल, पण त्याला हमीभाव नसेल तर शेतकऱ्यांनी काय करायचे? आता 'स्वामीनाथन आयोग' लागू करण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन निकराचा लढा देणे ही काळाची गरज आहे. राजकारण विरहित शेतकरी चळवळ उभी राहिली नाही, तर जिल्ह्यातील असंतोष मोठा उद्रेक घडवू शकतो. तरुणांच्या हाताला काम आणि पिकाला दाम न मिळाल्यास नक्षलवादासारखी संकटे ओढवतील आणि त्याला पूर्णतः शासन जबाबदार असेल, असे विलास सावंत यांनी प्रसिद्धी पत्रकातून स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg