loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनवी पूलाची एक मार्गीका मार्च अखेर पर्यंत सुरु करण्याचे आश्वासन फोल

संगमेश्वर (प्रतिनिधी) - मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण होणे म्हणजे एक चेष्टेचा विषय झाला आहे. गेली सतरा वर्षे राज्य आणि केंद्र सरकारकडून हा महामार्ग पूर्ण करण्याच्या नवनवीन तारखा दिल्या जात आहेत. नवीन तारखांचे एकही आश्वासन अद्याप पाळले गेले नसताना जन आक्रोश समितीने संगमेश्वर येथे ११ जानेवारी रोजी केलेल्या जोरदार रास्ता रोको आंदोलना दरम्यान राष्ट्रीय महामार्ग विभागाने संगमेश्वर येथील सोनवी पुलाची एक मार्गीका ३१ मार्च पूर्वी सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र मार्च महिना संपत आला असताना अद्याप ही एक मार्गिका सुरू न केल्याने, हे आश्वासन देखील राज्य आणि केंद्र सरकारच्या आश्वासना प्रमाणे फोल ठरले आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग गेली सतरा वर्षे रखडला आहे. अद्याप अनेक ठिकाणी अनेक कामे पूर्ण होणे बाकी आहेत. परिणामी पुढील दोन वर्षे तरी हा मार्ग पूर्ण होण्यास लागणार असल्याचे चित्र दिसत असल्याने या महामार्गाची नोंद गिनीज बुकात झाली तर, आश्चर्य वाटायला नको. अद्याप अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाच्या पूलांची, सेवा रस्त्यांची, सुरक्षाविषयक भिंतींची, मार्ग फलकांची, गटारांची, प्रवासी मार्ग निवाऱ्यांची, अनेक सुरक्षा उपायांची, महत्त्वाचे म्हणजे वृक्षारोपणाची कामे बाकी असताना राजापूर येथील हातिवली येथे टोल नाका सुरू करण्याच्या हालचाली झाल्या आहेत. या महामार्गाचे काम जवळपास दोन दशके सुरू असताना टोल घेण्याबाबत मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग किती तत्पर आहे? हेच यातून दिसून येते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर येथील सोनवी पुलाचा परिसर म्हणजे वारंवार होणारी वाहतूक कोंडी. एकदा का येथे वाहतूक कोंडी झाली कि, किमान दीड तास तरी वाहन चालकांचा आणि प्रवाशांचा खोळंबा होतो. संगमेश्वर येथे वाहतूक कोंडीत वाया जाणारा वेळ लक्षात घेता प्रवाशांकडून ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्गाच्या नावाने वेळोवेळी शिमगा केला जातो. मात्र या दोघांवरही याचा कोणताही परिणाम झाल्याचे दिसून येत नाही. राष्ट्रीय महामार्ग विभागाचे रखडलेले काम लक्षात घेता जन आक्रोश समितीने पनवेल पासून हातखंब्यापर्यंत ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलने केली. संगमेश्वर येथे सोनवी पुलाजवळ होणाऱ्या प्रचंड वाहतूक कोंडीकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे लक्ष वेधण्यासाठी ११ जानेवारी रोजी केलेले रास्ता रोको आंदोलन चांगलेच गाजले होते. जन आक्रोश समितीच्या या आंदोलनात तान्ह्या मुलाला घेऊन महिला देखील सहभागी झाल्या होत्या. रस्त्यावर झोपलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी फरपटत नेले होते. यावेळी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांकडून जन आक्रोश समितीला, संगमेश्वर सोनवी पुलाची एक मार्गीका ३१ मार्चपूर्वी कोणत्याही परिस्थितीत सुरू करू असे लेखी आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. असे असले तरी जन आक्रोश समितीच्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते.

टाईम्स स्पेशल

राष्ट्रीय महामार्ग विभागाने जन आक्रोश समितीला लेखी आंदोलन दिल्यानंतरही आता मार्च महिना संपत आला तरीही अद्याप सोनवी पुलाची एक मार्गीका सुरू करण्याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. या पुलाच्या दोन्ही बाजूचे काम होणे अद्याप बाकी असून यासाठी अजून काही कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी राष्ट्रीय महामार्ग विभागाने जन आक्रोश समितीला दिलेले लेखी आश्वासन पुन्हा एकदा राज्य आणि केंद्र शासनाच्या आश्वासना प्रमाणेच फोल ठरले आहे. आंबेडखुर्द, शास्त्री पूल आणि पैसा फंड इंग्लिश स्कूल समोर अद्याप सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. परिणामी येथे वारंवार अपघात घडण्याची स्थिती निर्माण होते. असे असताना या महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल वाहनचालक प्रवासी, पादचारी आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या आरवली ते बावनदी या हद्दीतील कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अनेक ठिकाणी रस्त्याची पातळी समान नसल्याने वाहन वेगाने जात असताना मध्येच वाहन आपटून आतील प्रवाशांना मार बसत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्या आहेत. रस्त्याच्या दुभाजकाला वाहनाची चाक जरा घासले तरी, ते मोडून पडत आहेत. काही ठिकाणी संरक्षक भिंतीच्या लोखंडी सळ्या तशाच अर्धवट सोडून ठेवल्याने धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी अद्याप फलक लावले नसल्याने वाहन चालकात संभ्रम निर्माण होत आहे. केंद्र सरकारने तज्ञ समितीमार्फत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दर्जाची पाहणी करावी आणि नंतर काम पूर्ण झाल्यावरच टोल सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश कदम यांनी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg