loader
Breaking News
Breaking News
Foto

वडाची साल पिंपळाला योग्य नव्हे, इटलीची कोणतीही बंद पडलेली कंपनी लोटेत आणल्याची वावडी ही तद्दन खोटी!

लोटे (प्रतिनिधी) - मागील काही महिन्यांपासून लोटे येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज या कंपनीबाबत सोशल मिडियावर धुळवड सुरु असून ती अचानक कशी काय सुरु झाली याचे कोडे सर्वांना पडले आहे... कुणाच्याही ध्यानी मनी नसताना ही धुळवड सुरु झाली ती नेमकी कोणत्या कारणाने याचा उलगडा अद्यापही सर्वसामान्य जनतेपासून जाणकारांपर्यंत कुणालाही झालेला नाही. इटली येथील एक बंद पडलेली कंपनी लोटे येथे आणून ती लक्ष्मी इंडस्ट्रीज या नावाने सुरु करण्यात आली असे सांगण्यात येत असे... परंतु इटली येथून बंद पडलेली अशी कोणतीही कंपनी लोटे येथे आणून लक्ष्मी इंडस्ट्रीज सुरु करण्यात आलेली नाही हे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे सोशल मिडीयाचा ‘कारोबार’ कसा असतो हे दिसून आले असे सडेतोड मत याबाबत व्यक्त करण्यात आले. सोशल मिडीयावर मागील काही काळापासून धुळवड सुरु असली तरी जबाबदार वृत्तपत्रांनी त्याबाबत सावधगिरीची भूमिका घेतली आहे. कुणाच्याही ध्यानी मनी नसताना अचानक सोशल मिडियावर एका मागोमाग एक व्हिडीओ प्रसिद्ध होऊ लागले. इटली येथील एक बंद असलेली कंपनी उचलून लोटे येथे आणण्यात आली व लक्ष्मी ऑर्गेनिक या नावाने सुरु करण्यात आली असा डांगोरा पिटण्यात येत असे. परंतु इटलीची कंपनी उचलून लोटे येथे आणली हे तद्दन खोटे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे... असे जर असेल तर मग हे सर्व कशासाठी करण्यात येत होते असा प्रश्‍न आता परिसरातील जनतेत विचारला जाऊ लागला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

इटली येथील बंद पडलेली कंपनी आणून लक्ष्मी इंडस्ट्रीज सुरु करण्यात आली हे खोटे असल्याची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यात आली आहे. रत्नागिरीतील स्टरलाईट इंडस्ट्रीजने ब्राझीलमध्ये बंद पडलेल्या एका जुनाट कॉपर स्मेल्टर कंपनीची जवळपास भंगार झालेली मशिनरी रत्नागिरीत आणली होती... तसा काही प्रकार येथे घडला का? इटली येथील त्या कंपनीकडून काही तांत्रिक ‘नो हाऊ’ म्हणजेच तांत्रिक बाबींचे सहकार्य घेण्यात आले, परंतु कोणतीही भंगार मशिनरी किंवा प्लँट लोटे येथे आणून जसाचा तसा बसविलेला नाही ही बाब आता स्पष्ट करण्यात आली आहे. मुळात इटली येथील प्रकल्प हा १९६० च्या दशकातील प्रकल्प होता. म्हणजेच सुमारे ६५ ते ७० वर्षे जुना असा तो प्रकल्प होता... तेथील मशिनरी देखील त्याच काळातील होती... ती जुनाट मशिनरी बसवण्याचा प्रश्‍नच नव्हता व लोटे येथे बसविण्यात आलेली देखील नाही याची नि:संदिग्ध ग्वाही देण्यात आली आहे. विविध कंपन्या तांत्रिक माहितींचे आदानप्रदान करतात तशा पद्धतीने काही तांत्रिक मुलभूत माहिती घेण्यात आली. व ती आधुनिक पद्धतीने ‘अपग्रेड’ करण्यात आली... असे असताना इटली येथील बंद पडलेली कंपनी उचलून लोटेत आणून सुरु करण्यात आल्याची बोंब कितपत योग्य ठरते? काही काळापासून लोटे येथे लक्ष्मी इंडस्ट्रीजचा हा प्रकल्प कोणतीही तक्रार न उद्भवता शांतपणे सुरु आहे. लक्ष्मी इंडस्ट्रीजचा महाड येथील प्रकल्प तर मागील सुमारे ३६ वर्षांपासून तेथे शांततेत नांदत आहे... आजवर कोणतीही तक्रार उद्भवली नाही. अशा स्थितीत लोटे येथील लक्ष्मी इंडस्ट्रीज सुरु करण्यापूर्वी जन सुनावणी का घेण्यात आली नाही असा प्रश्‍न करण्यात आला. त्याबाबत माहिती घेण्यात आली तेव्हा स्पष्ट झाले की, या प्रकल्पासाठी खाजगी जमीन घेण्यात आलेली नाही तर एम.आय.डी.सी.तून प्लॉट घेऊन तेथे कंपनीचे कामकाज सुरु झाले.

टाइम्स स्पेशल

मुळातच ती जागा एमआयडीसीची असल्याने तेथे जन सुनावणी घेण्याची आवश्यकता उद्भवत नाही. खाजगी जमीन संपादीत करण्यात आली असती तरच जन सुनावणी घ्यावी लागते. तसेच एमआयडीसीने दिलेला प्लॉट हा केमिकल झोनमधील असल्याने तेथे लक्ष्मी इंडस्ट्रीजचा प्रकल्प सुरु करणे शक्य झाले. त्यामुळे प्रकल्प सुरु करण्यापूर्वी जन सुनावणी का घेण्यात आली नाही हा मुद्दा आपोआप बाजूला पडतो... याबाबत बोलताना अनेकांनी सडेतोड मत व्यक्त केले की, उगाच काहीतरी खुसपटे काढण्यात अर्थ नाही. मागील काही काळापासून जोरदार उलट सुलट वावड्या उठविण्यात येत आहेत... जणू काही मंडळींच्या कल्पनेला पंख फुटले असे म्हणावे लागेल. जर एखादा प्रकल्प प्रदूषण करणारा असेल तर त्याबाबत ज्येष्ठ तज्ञ व एक्सपर्ट मंडळींचे मत विचारात घेण्यात येते. रत्नागिरीत जगप्रसिद्ध स्टरलाईट आंदोलन झाले त्यावेळीही डझनभर तज्ञ व एक्सपर्ट मंडळींची मते विचारात घेण्यात आली होती. एवढेच नव्हे तर त्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरील पर्यावरण तज्ञ डॉ. रश्मी मयूर यांनीही आपले सडेतोड मत रत्नागिरीत येऊन स्पष्ट केले होते... तसे काही येथे कुणाही तज्ञांनी प्रकल्पा विरोधात मत व्यक्त केलेले नाही... असे असताना आम्हाला नको म्हणून प्रकल्प रद्द करा असे कुणी म्हणत असेल तर त्याला काय म्हणावे? अशी नेमकी प्रतिक्रिया याबाबत बोलताना काही मंडळींनी व्यक्त केली. जबाबदार वृत्तपत्रे नेहमीच सबळ पुराव्याशिवाय वृत्त प्रसिद्ध करीत नसतात त्यामुळे सोशल मिडियात जरी मागील काही काळापासून धुळवड सुरु असली तरी जबाबदार वृत्तपत्रांमध्ये त्याबाबत फारशा बातम्या झळकल्या नाहीत. याबाबत बोलताना काही पत्रकारांनी नेमक्या शब्दात सांगितले की, ‘‘काही सबस्टन्स (मुद्दा) दिसून येत नाही, त्यामुळे वृत्ते घेता येत नाहीत’’... जाणकारांच्या या एका वाक्यातच सारे काही स्पष्ट झाले... अर्थात सर्वसामान्य जनता ही अतिशय संयमी व सुजाण असते... जनता सर्व काही मनोमन जाणत असते... त्यामुळे सोशल मिडियावर कितीही धुळवड झाली तरी आंदोलन बाळसे धरु शकले नाही ही वस्तुस्थिती मान्य करावी लागेल अशी चर्चा आता जनतेत ठायी ठायी सुरु झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg