loader
Breaking News
Breaking News
Foto

तळेकांटे ग्रामस्थांचा लोकसहभागातून मुंबई-गोवा महामार्गावर १,००० वृक्ष लागवडीचा संकल्प

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - हवामान बदल, वाढते तापमान, पाण्याची टंचाई आणि पर्यावरणीय असंतुलन या गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील ‘तळेकांटे‘ गावातील ग्रामस्थांनी लोकसहभागातून मुंबई गोवा महामार्गाच्या दुतर्फा झाडे लावण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या हस्ते या वृक्षारोपण मोहिमेची सुरुवात होणार आहे.यावेळी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनाही निमंत्रित केले आहे. रविवार, २८ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता मुंबई गोवा महामार्गावरील ‘तळेकांटे-बावनदी ते सप्तलिंगी पुला’च्या दरम्यान 6 किलोमीटरच्या परिसरात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात ,१००० झाडे लावण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वड, पिंपळ, चिंच, जांभूळ, आंबा, फणस, नीव, बहावा यांसारखी स्थानिक हवामानास पूरक व पर्यावरणदृष्ट्या महत्त्वाची झाडे लावण्यात येणार आहेत. या वृक्षांमुळे भविष्यात सावली, भूजल संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलन राखण्यास मदत होणार आहे. विशेष म्हणजे ग्रामस्थांनी कोणत्याही सरकारी मदतीची प्रतीक्षा न करता स्वतःहून निधी उभारणी सुरू केली असून गावातील प्रत्येक कुटुंबाने वर्षभर वृक्षसंगोपनाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्धार केला आहे. एका झाडासाठी झाड, खड्डा, सेंद्रिय खत, संरक्षणासाठी जाळी आणि पावसाळ्यानंतर पाण्याची व्यवस्था यांसह होणारा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई गोवा महामार्गावर आपल्या गावाच्या हद्दीत झाडे लावण्याचा आणि त्याचे संगोपन करण्यासाठी संपूर्ण गावाने पुढाकार घेण्याचा प्रयत्न हा जिल्ह्यातील पहिलाच उपक्रम असावा. याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चित्रपट, मालिका क्षेत्रातील मान्यवरांनी तसेच गावातील तरुण मुलामुलींनी व्हिडिओ, रीळ,पोस्टर आदीच्या सहाय्याने वृक्षारोपण मोहिमेची सोशल मिडियाच्या माध्यमातून जोरदार प्रसिद्धी केलेली आहे.

टाईम्स स्पेशल

“हा केवळ वृक्षारोपणाचा कार्यक्रम नसून पुढील पिढ्यांसाठी शुद्ध हवा, थंड सावली आणि समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याचा सामूहिक प्रयत्न आहे,” असे तळेकांटे गावच्या सरपंच सुषमा बने यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलास चाळके, नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजीत हेगशेट्ये, उद्योजक सुरेश कदम, जिल्हापरिषद सदस्य प्रमोद अधटराव, चिपळूण येथील वशिष्ठी डेअरीचे प्रशांत यादव,परकार हॉस्पिटलचे डॉ.अलिमिया परकार, रत्नागिरी येथील सांबरे हॉस्पिटलचे केदार चव्हाण, देवरुख येथील हेमंत तांबे यांना निमंत्रित केले आहे. तसेच नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या रत्नागिरी आणि संगमेश्वर कॉलेजच्या NSS युनिटचे विद्यार्थी, प्राध्यापक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक पर्यावरणप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित रहाणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg