loader
Breaking News
Breaking News
Foto

भरतीच्या लाटांमध्ये अडकलेल्यांसाठी जीवरक्षक, पोलीस व दामिनी पथक ठरले देवदूत

संगलट (खेड)(इक्बाल जमादार) - अलिबाग समुद्रकिनार्‍यावर घडलेल्या थरारक घटनेत भरतीच्या वेगवान लाटांमध्ये अडकलेल्या सात पर्यटकांना सुखरूप वाचविण्यात यश आले. जीवरक्षक, पोलीस, दामिनी पथक आणि होमगार्ड जवानांच्या धाडसी व तत्पर बचावकार्यामुळे मोठी दुर्घटना टळली असून सात जणांना नवजीवन मिळाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही पर्यटक समुद्राचा आनंद घेत असताना भरतीमुळे अचानक समुद्रातील पाण्याची पातळी वाढू लागली. वेगवान लाटा आणि समुद्रातील बदलत्या प्रवाहामुळे पर्यटक अडचणीत सापडले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच समुद्रकिनार्‍यावर तैनात असलेल्या जीवरक्षकांनी तात्काळ बचाव मोहिम सुरू केली. या बचावकार्यात जीवरक्षक कुणाल सारंग आणि प्रथमेश सारंग यांनी धाडसाचे दर्शन घडवत समुद्रात उतरून पर्यटकांना सुरक्षित स्थळी आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना बीट मार्शल पोलीस शिपाई सतीश कणसे आणि रेवननाथ शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच दामिनी पथकातील महिला पोलीस शिपाई अंकिता घवाळे, होमगार्ड सिद्धेश नाईक आणि अमरनाथ पाल यांनीही घटनास्थळी तत्परतेने मदत करत बचावकार्य यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये नूर मोहम्मद परवेझ मेमन, रायन उनोस मेमन, अकीफ शेख, नदीम शेख, गफ्फार बुबेरे यांच्यासह एकूण सात पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. काही काळासाठी समुद्रकिनार्‍यावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, बचाव पथकाच्या शौर्यामुळे सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचे स्पष्ट होताच उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. अलिबाग समुद्रकिनारा हा राज्यातील लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असून सुट्टीच्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक भेट देतात. भरती-ओहोटीच्या वेळा आणि समुद्रातील प्रवाहाचा अंदाज न आल्यास अशा घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यटकांनी समुद्रात उतरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि जीवरक्षक तसेच पोलिसांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टाईम्स स्पेशल

दरम्यान, या धाडसी आणि यशस्वी बचाव मोहिमेबद्दल अलिबाग नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान बांधकाम सभापती प्रशांत नाईक यांनी जीवरक्षक, पोलीस, दामिनी पथक आणि होमगार्ड जवानांचे विशेष अभिनंदन केले. त्यांच्या तत्परतेमुळे सात पर्यटकांचे प्राण वाचले असून हे कार्य अत्यंत कौतुकास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले. समुद्रकिनार्‍यावरील सुरक्षा व्यवस्थेत योगदान देणार्‍या सर्व कर्मचार्‍यांचे त्यांनी अभिनंदन करत भविष्यातही अशाच प्रकारे नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले. या संपूर्ण घटनेमुळे समुद्रकिनार्‍यांवरील सुरक्षा व्यवस्थेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले असून जीवरक्षक, पोलीस आणि होमगार्ड यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg