loader
Breaking News
Breaking News
Foto

आजपासून पावसाळी अधिवेशन, आंबा-काजू नुकसानभरपाई, अणुऊर्जा प्रकल्पावरून महायुती सरकारची लागणार कसोटी

मुंबई (ज्ञानेश्वर रावराणे ) - राज्याच्या विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून मुंबईत सुरू होत आहे. राज्यात पावसाने ओढ दिल्याने निर्माण झालेले दुष्काळाचे सावट, शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी, प्रलंबित आंबा-काजू नुकसान भरपाई आणि प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प यांसारख्या अनेक ज्वलंत प्रश्नांवरून या अधिवेशनात विरोधक आवाज उठविण्याची शक्यता असून राजकीय गरमागरमी आणि जनतेचे प्रलंबित प्रश्न यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी जाहीर केली असली तरी, त्यातील जाचक अटी, पात्रता आणि अंमलबजावणीबाबत अद्याप मोठा संभ्रम आहे. सरसकट कर्जमाफी मिळावी यावरून विरोधक आक्रमक आहेत. त्यातच जून महिना संपत आला तरी अपेक्षित पाऊस न पडल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्यामुळे बळीराजावर दुबार पेरणीचे अस्मानी संकट ओढावले आहे. यावरून विरोधक सत्ताधार्‍यांची कोंडी करतील. अधिवेशनातील एक अत्यंत कळीचा मुद्दा ठरणार आहे. मागील अधिवेशनात सरकारने आंबा व काजूसाठी नुकसान भरपाई जाहीर केली होती, परंतु ती अद्याप शेतकर्‍यांच्या पदरात पडलेली नाही. आश्वासने देऊनही अंमलबजावणी न झाल्याने शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे. शेतकर्‍यांचा हाच रोष विशेषता ठाकरे सेनेचे आमदार भास्कर जाधव हे कोकणातील अनेक प्रश्नावर सरकाराला धारेवर धरतील, अशी चिन्हे आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पावसाने दडी मारल्याने त्याचा कोकणातील प्रमुख पीक असलेल्या भातशेतीला याचा सर्वाधिक फटका बसत आहे. भाताच्या रोपवाटिका (तरवे) पाण्याअभावी सुकू लागल्या आहेत. आणखी काही दिवस पाऊस न आल्यास ही रोपे पूर्णपणे वाया जातील आणि शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान होईल. जून महिना संपत आला तरी पावसाने पाठ फिरवल्यामुळे कोकणातील बळीराजावर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढावले आहे. सुरुवातीच्या वळवाच्या किंवा मान्सूनपूर्व पावसाच्या भरवशावर अनेक शेतकर्‍यांनी धूळवाफेवर पेरण्या केल्या होत्या; मात्र आता पावसाने दडी मारल्याने जमिनीत टाकलेले महागडे बियाणे करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कोकणातील प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पावरूनही या अधिवेशनात मोठे रणकंदन माजण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाला होत असलेला विरोध आणि त्या अनुषंगाने निर्माण होणारे धोके यावर विरोधी पक्ष नेमकी काय आणि किती आक्रमक भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. स्थानिकांचा आवाज सभागृहात घुमवून सरकारला बॅकफूटवर ढकलण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल.

टाईम्स स्पेशल

सत्ताधारी पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सातत्याने वाढत चाललेला गुन्हेगारीचा आलेख, एसपी यांच्या कारभारावर टीका आणि त्यानंतर विशेषतः गृहखात्यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाढते अनैतिक धंदे, पोलिसांवर केलेले आरोप आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणून विरोधक सत्ताधार्‍यांवर तुटून पडणार का? या कडे लक्ष लागले आहेत. राज्यात सत्ताधार्‍यांकडून सुरू असलेले फोडाफोडीचे राजकारण, राजकीय गद्दारी यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जाणार असून, त्यात आंबा काजू भरपाईची तरतूद होणार का ?तर कर्जमाफीसाठी लागणार्‍या निधीची तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. यावर अधिवेशनाच्या दुसर्‍या आठवड्यात सविस्तर चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. मात्र, त्याआधीच सभागृहाचे कामकाज वादळी ठरण्याची चिन्हे आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg