loader
Breaking News
Breaking News
Foto

धामणी ग्रामपंचायतीत दिव्यांगांसाठीच्या व्हीलचेअर धुळखात; जबाबदार कोण?

संगमेश्वर /सत्यवान विचारे : तालुक्यातील धामणी ग्रामपंचायत इमारतीमध्ये दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी लोकसभा निवडणुकीदरम्यान उपलब्ध करून देण्यात आलेल्या व्हीलचेअर गेली दोन वर्षे वापराविना धुळखात पडून असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या कालावधीत आलेल्या महापुराच्या पाण्यात या व्हीलचेअर दोनदा बुडाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासनाच्या मालमत्तेबाबत झालेल्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नुकत्याच तुरळ ग्रामपंचायत सभागृहात पार पडलेल्या कडवई प्रभाग समितीच्या बैठकीत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास पेंडसे यांनी हा मुद्दा उपस्थित केला. बैठकीत हा विषय मांडल्यानंतर उपस्थित सदस्य आणि अधिकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. प्रभाग समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत खुलासा मागितला.बैठकीत उपस्थित करण्यात आलेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या काळात दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रावर सहज प्रवेश मिळावा यासाठी या व्हीलचेअर आणण्यात आल्या होत्या. मात्र निवडणूक प्रक्रिया संपल्यानंतर त्या दिव्यांग नागरिकांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याऐवजी ग्रामपंचायत इमारतीतच पडून राहिल्या.त्यानंतर विधानसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकादेखील पार पडल्या, तरीही या साहित्याचा कोणताही उपयोग करण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.धामणी परिसरात गेल्या दोन वर्षांत आलेल्या महापुरामुळे ग्रामपंचायत इमारतीमध्ये पाणी शिरले होते. या पुराच्या पाण्यात व्हीलचेअर बुडाल्याने त्यांचे चाक, धातूचे भाग आणि इतर साहित्य गंजून खराब झाले आहे. दिव्यांगांच्या सेवेसाठी शासनाकडून उपलब्ध करून दिलेल्या सुविधांची अशी दुर्दशा झाल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.बैठकीत या व्हीलचेअरची जबाबदारी नेमकी कोणाकडे आहे, यावरही चर्चा रंगली. निवडणूक विभागाने त्या परत नेणे अपेक्षित होते की गटविकास अधिकारी कार्यालयाने त्यांची देखभाल करून दिव्यांगांच्या वापरासाठी उपलब्ध करून द्यायला हवे होते, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. संबंधित विभागांमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळेच हा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.

टाइम्स स्पेशल

जिल्हा परिषद सदस्य संतोष थेराडे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करण्याची आवश्यकता व्यक्त केली. शासनाच्या निधीतून उपलब्ध करून दिलेल्या साहित्याची अशी नासधूस होणे गंभीर बाब असून, संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.दरम्यान, दिव्यांगांच्या हक्काच्या सुविधांकडे दुर्लक्ष होणे ही अत्यंत खेदजनक बाब असल्याची प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg