loader
Breaking News
Breaking News
Foto

मंत्रालयातील ६ व्या माळ्यावरून नोकरीचा महाघोटाळा! ४० तरुणांना कोट्यवधींचा गंडा ? गुन्हा दाखल

मुंबई (विशेष प्रतिनिधी):*मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाचा (दालनाचा) गैरवापर करून शासकीय नोकऱ्यांचे बनावट आमिष दाखवून तरुणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री यांचे पीए (PA) प्रभाकर काळे यांच्यासह पाच जणांविरोधात मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या आवारातच थेट मुलाखती घेऊन तरुणांना बनावट नियुक्तीपत्रे देण्यापर्यंत या टोळीची मजल गेल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तळोजा येथील रहिवासी वर्षा भुताळे यांनी याप्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या बहिणीचा मुलगा रितेश कांबळे (रा. नांदेड) याला शासकीय सेवेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यासाठी सुरुवातीला २० लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, मात्र अखेर ७ लाख ६५ हजार रुपयांवर बोलणी पक्की झाली. भुताळे यांनी आरोपी विश्वनाथ गच्चे यांच्या बँक खात्यात ७ लाख २५ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर केले, तर ४० हजार रुपये रोख स्वरूपात दिले.पैसे मिळाल्यानंतर आरोपी विश्वनाथ गच्चे, साईनाथ व्हटकर, स्नेहल कोळी आणि मनोहर चोरगे यांनी रितेशची थेट मंत्रालयाच्या तळमजल्यावर मुलाखत घेतली. इतकेच नव्हे, तर त्याला सातव्या माळ्यावर मुख्यमंत्र्यांच्या दालनात नेऊन त्याची पोस्टिंग कुठे होणार आहे, हे देखील दाखवण्यात आले. त्यानंतर त्याला मुंबईतील जी.टी. रुग्णालयात नेऊन त्याची वैद्यकीय तपासणी (Medical Test) करण्यात आली. "मुख्यमंत्री सध्या फाईलवर स्वाक्षरी करत नाहीयेत," अशी बतावणी करत आरोपींनी त्याला 'फॉरेस्ट गार्ड' (वनरक्षक) पदाचे बनावट नियुक्तीपत्र आणि प्रशिक्षणाचे पत्र हाती सोपवले.

टाइम्स स्पेशल

नियुक्तीपत्र दिल्यानंतर रितेशला जॉईनिंगसाठी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे नेण्यात आले. तिथून पुन्हा मेडिकलच्या नावाखाली नाशिकला आणले. त्यानंतर आठ दिवसांच्या ट्रेनिंगसाठी त्याला सातारा जिल्ह्यातील पाटण येथे नेण्यात आले. मात्र, तिथे कोणतेही ट्रेनिंग झालेच नाही. आरोपी साईनाथ व्हटकर रितेशला तिथेच एकटे सोडून पळून गेला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भुताळे यांनी आरोपींशी संपर्क साधला .या घोटाळ्याची व्याप्ती अत्यंत मोठी असण्याची शक्यता आहे. वर्षा भुताळे यांनी एफआयआर (FIR) मध्ये नमूद केले आहे की, ज्या दिवशी रितेशची मंत्रालयात मुलाखत झाली, त्याच दिवशी तिथे सुमारे ४० तरुण मुलाखतीसाठी आले होते. या सर्व तरुणांकडून नोकरीसाठी प्रत्येकी १५ ते २० लाख रुपये उकळण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. वर्षा भुताळे जेव्हा या तरुणांशी बोलण्याचा प्रयत्न करत होत्या, तेव्हा आरोपी विश्वनाथ गच्चे आणि स्नेहल कोळी यांनी त्यांना दमदाटी केली होती.मंत्रालयासारख्या राज्याच्या सर्वोच्च आणि सुरक्षित ठिकाणी हे फसवणुकीचे रॅकेट कसे चालत होते? आरोपींना मंत्रालयात मुक्त प्रवेश कसा मिळत होता? या मागे आणखी कोणाचे हात आहेत का? याचा सखोल तपास आता मरीन ड्राईव्ह पोलीस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg