loader
Breaking News
Breaking News
Foto

देवा, एका सरीची उधारी दे; शेतकर्‍यांच्या स्वप्नांना उभारी दे; कोकणातील बळीराजाचे आभाळाकडे डोळे

देवळे (प्रकाश चाळके) - तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई... हरवली वाट दिशा अंधारल्या दाही... या गीतातील वेदना आज कोकणातील शेतकर्‍यांच्या काळजाचा हुंदका बनून आकाशाकडे झेपावत आहेत. निसर्गाच्या लहरीपणासमोर हतबल झालेला बळीराजा आज देवाच्या दारी उभा राहून पावसासाठी आर्त हाक देत आहे. मृग नक्षत्र संपत आले, तरीही आभाळाने पाठ फिरवल्याने कोकणातील शेतकरी चिंतेच्या गर्तेत सापडला आहे. यंदा अनेक शेतकर्‍यांनी वेळ न दवडता मशागतीची कामे पूर्ण करून भाताची पेरणी केली. काही ठिकाणी राब भाजून धूळवाफ्यावर बियाणे टाकण्यात आले. मात्र अपेक्षित पाऊस न पडल्याने जमिनीत विसावलेले बियाणे उगवेल की नाही, याची भीती शेतकर्‍यांच्या मनात घर करून बसली आहे. काळेकुट्ट ढग आकाशात जमा होतात, वार्‍याची झुळूक आशा निर्माण करते, पण काही क्षणांतच सर्व काही विरून जाते. आभाळ भरून येते, मात्र बरसत नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गेल्या वर्षी २० मेपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मृग नक्षत्रातील जोरदार पावसाने संपूर्ण कोकण चिंब भिजले होते. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे उलट आहे. कोकणात पावसाच्या आगमनाची पारंपरिक तारीख मानला जाणारा १५ जूनचा टप्पाही उलटून गेला, तरी समाधानकारक पावसाचा मागमूस दिसत नाही. शेतातील प्रत्येक बांध, प्रत्येक वाफा आणि प्रत्येक रोप जणू आकाशाकडे टक लावून पाहत आहे. भेगाळलेल्या मातीत पडलेले बियाणे पावसाच्या एका थेंबासाठी आसुसले आहे. शेतकर्‍यांच्या डोळ्यांतील आशेचे पाणी आता चिंतेच्या अश्रूंमध्ये रूपांतरित होऊ लागले आहे. तरी नाही धीर सांडला... देवा खेळ मांडला... अशा विवंचनेत शेतकरी दिवस ढकलत आहे. कोकणातील शेती ही केवळ उदरनिर्वाहाचे साधन नाही, तर येथील संस्कृती, परंपरा आणि कुटुंबव्यवस्थेचा आत्मा आहे. भात शेतीवर हजारो कुटुंबांचे आर्थिक चक्र अवलंबून आहे.

टाईम्स स्पेशल

खरीप हंगाम म्हणजे वर्षभराच्या जगण्याचा आधार. तोच हंगाम धोक्यात येऊ लागल्याने शेतकर्‍यांच्या मनावरील ताण दिवसेंदिवस वाढत आहे. मशागतीचा खर्च, बियाण्यांवरील गुंतवणूक, कर्जाचा बोजा आणि पुढील हंगामाचे गणित यामुळे चिंता अधिक गडद होत चालली आहे. घरातील ज्येष्ठ मंडळी देव्हार्‍यासमोर हात जोडून बसली आहेत. शेतकरी उंबरठ्यावर उभा राहून आभाळाकडे नजर लावून आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या मनात एकच प्रश्न आहे, पाऊस कधी येणार? करपलेल्या रानावर, जळलेल्या शिवारावर एक सर यावी, मातीला जीव मिळावा आणि बियाणे उगवावे, एवढीच साधी अपेक्षा आज कोकणातील शेतकरी बाळगून आहे. सांडली गा रीत भात, घेतला वसा तुझा... दावी देवा पैलपार, पाठीशी तू र्‍हा हुबा... अशी आर्त प्रार्थना करत कोकणातील बळीराजा आज आकाशाकडे डोळे लावून बसला आहे. कारण हा आता केवळ पावसाचा प्रश्न राहिलेला नाही; हा कोकणच्या मातीतल्या जीवनाचा, शेतकर्‍यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या जगण्याच्या आशेचा प्रश्न बनला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg