loader
Breaking News
Breaking News
Foto

मालवण शहरात वीज खांब कोसळून मोठ्या अपघाताची शक्यता, महावितरण दुर्घटनेची वाट पाहतेय का? शहरप्रमुख बाबी जोगी

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहरातील महावितरण व्यवस्थेची दुरवस्था पाहता प्रशासन शहरात एखादा मोठा अपघात घडण्याचीच वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख बाबी जोगी यांनी उपस्थित केला आहे. ‘आंधळं दळतय, कुत्रं पीठ खातयं’ अशी अवस्था सध्या महावितरणच्या कारभाराची झाली असून निष्पाप जनतेच्या जिवाची यांना अजिबात काळजी नाही, असा घणाघातही त्यांनी केला. धुरीवाडा प्रभाग क्रमांक १ मधील साहेबा हॉटेलनजीक असलेला एक विद्युत पोल गेल्या कित्येक दिवसांपासून पूर्णपणे वाकलेल्या अवस्थेत आहे. हा पोल कधीही कोसळून मोठी दुर्घटना घडू शकते, मात्र याकडे प्रशासनाने पूर्णपणे डोळेझाक केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

चिवला बीच धुरीवाडा येथे समुद्राच्या बाजूला महावितरणने बसवलेल्या डीपी बॉक्स पेट्या पूर्णपणे उघड्या अवस्थेत आहेत. बाबी जोगी यांनी सांगितले की, पावसाळा अगदी तोंडावर आला आहे. समुद्राकाठच्या या उघड्या वीज पेट्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि पावसाचे पाणी थेट आत शिरणार आहे. यामुळे संपूर्ण परिसरात शॉर्ट सर्किट होऊन मोठा अनर्थ घडण्याची दाट शक्यता आहे. याचा थेट फटका स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना बसणार आहे. अधिकारी सध्या सांगत आहेत की ’पावसाळ्या पूर्वीची कामे’ सुरू आहेत, पण प्रत्यक्षात हीच का तुमची कामे? असा सवाल त्यांनी केला.

टाईम्स स्पेशल

वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे मालवणात ’स्मार्ट मीटर’ कसे बसवता येतील, यासाठीच सर्व अधिकारी रात्रीचा दिवस करून प्रयत्न करत आहेत. मात्र, ज्या मूलभूत सुविधा आणि सुरक्षा पुरवणे गरजेचे आहे, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात आहे. हे मालवणकरांचे मोठे दुर्दैव आहे, अशी खंत जोगी यांनी व्यक्त केली. मालवण शहरात महावितरणच्या निष्काळजीपणामुळे जर एखादा अपघात घडला किंवा कोणाचा जीव गेला, तर संबंधित जबाबदार अधिकार्‍यांना खुर्चीत बसू देणार नाही, असा इशारा शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी यांनी दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg