loader
Breaking News
Breaking News
Foto

मंडणगड येथील निवळी नदीपात्रात झुडपात आढळला अज्ञात प्रौढाचा कुजलेला मृतदेह

संगलट (खेड) (प्रतिनिधी) - मंडणगडतालुक्यातील सुर्ले येथील निवळी नदीच्या पात्रातील झुडपामध्ये एका ४५ ते ५५ वर्षे वयाच्या अज्ञात इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नदीत मासेमारीसाठी गेलेल्या ग्रामस्थांमुळे ही घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ११ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुर्ले येथील स्थानिक ग्रामस्थ पांडुरंग दशरथ जाधव हे निवळी नदीला पाणी कमी असल्याने तेथील डोहात मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत त्यांचे आई-वडील, पत्नी आणि चुलत भाऊ संजय सुभाष जाधव तसेच त्यांचा पाळीव कुत्राही होता. सर्वजण नदीत मासे पकडण्यात व्यस्त असताना, अचानक त्यांचा कुत्रा नदीच्या कडेला असलेल्या दाट झुडपाच्या दिशेने पाहून सातत्याने भुंकू लागला. कुत्र्याचे भुंकणे थांबत नसल्याने संशय आल्याने पांडुरंग जाधव यांनी झुडपाच्या जवळ जाऊन पाहिले असता, त्यांना तिथे एक अज्ञात पुरुष मृत अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसून आला. मृतदेह काही दिवस जुना असल्याने तो कुजण्यास सुरुवात झाली होती आणि त्यावर माश्या व किडे घोंगावत होते.

टाईम्स स्पेशल

हा प्रकार पाहताच पांडुरंग जाधव यांनी तातडीने भिंगळोलीचे पोलीस पाटील संतोष मळेकर यांना मोबाईलवरून या घटनेची माहिती दिली. पोलीस पाटील मळेकर यांनी तात्काळ सुर्ले गावाच्या पोलीस पाटलांशी संपर्क साधून घटनेचे गांभीर्य सांगितले. त्यानंतर सुर्ले पोलीस पाटलांनी त्यांच्या पतीला तातडीने घटनास्थळी पाठवून मृतदेहाची खात्री करून घेतली. यानंतर मंडणगड पोलीस ठाण्यात घडलेल्या प्रकाराबाबत अधिकृत माहिती देण्यात आली. ग्रामस्थांनी दिलेल्या या तक्रारीवरून मंडणगड पोलिसांनी ११ जून रोजी रात्री ८ वाजून १६ मिनिटांनी अमृ. क्रमांक १०/२०२६ आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू म्हणून या प्रकरणाची नोंद केली आहे. सदर मृत पुरुष कोण आहे, तो तेथे कसा पोहोचला आणि त्याच्या मृत्यूचे नेमके कारण काय, याचा अधिक तपास मंडणगड पोलीस करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg