loader
Breaking News
Breaking News
Foto

पड रं पाण्या...., पड रं पाण्या....कर पाणी..., पाणी...! बळीराजाचे देवाकडे साकडे...

वरवेली (गणेश किर्वे) - ’तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई... हरवली वाट दिशा अंधारल्या दाही...’या लोकगीताच्या ओळींमधील वेदना सध्या कोकणातील शेतकर्‍यांच्या मनःस्थितीचे अचूक चित्रण करत आहेत. मृग नक्षत्र संपले, तरी पावसाने हजेरी न लावल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी चिंतेत सापडला आहे. निसर्गाच्या लहरीपणासमोर हतबल झालेला बळीराजा आता पावसासाठी देवाकडे साकडे घालत आहे. गुहागर तालुक्यातील अनेक शेतकर्‍यांनी खरीप हंगामाच्या तयारीसाठी मशागतीची कामे पूर्ण करून काही ठिकाणी धूळवाफ्यावर भाताची पेरणीही केली आहे. आकाशात दररोज काळेकुट्ट ढगांची गर्दी होत असली, तरी पावसाचा एक थेंबही जमिनीवर पडत नसल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत भर पडली आहे. मृग नक्षत्र संपले तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरलेले बियाणे उगवेल की नाही, तर काही ठिकाणी उगवलेली रोपे जगतील कि नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी मे महिन्याच्या उत्तरार्धातच अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर मृग नक्षत्रातील जोरदार पावसामुळे संपूर्ण कोकण चिंब भिजला होता. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कोकणातील शेतकर्‍यांसाठी केवळ शेतीचा हंगाम नसून वर्षभराच्या उदरनिर्वाहाचा आधार असतो. भात शेतीवर हजारो कुटुंबांचे आर्थिक चक्र अवलंबून असल्याने पावसाचा प्रत्येक लांबलेला दिवस चिंता वाढवणारा ठरत आहे. मशागतीचा खर्च, बियाण्यांवरील गुंतवणूक, कर्जाची परतफेड आणि आगामी हंगामाचे गणित यामुळे शेतकर्‍यांवरील मानसिक ताण अधिकच वाढत आहे. शेतकरी आभाळाकडे डोळे लावून उभा आहे. करपलेल्या शिवारावर एक सर यावी, मातीत ओलावा यावा आणि पेरलेल्या बियाण्यांना जीवदान मिळावे, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. काळ्या ढगांनी अखेर दयाघन व्हावे आणि जीवनदायी पाऊस बरसावा. तरी न्हाई धीर सांडला... खेळ मांडला...’ या भावनेने कोकणातील बळीराजा अजूनही पावसाची वाट पाहत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg