loader
Breaking News
Breaking News
Foto

रोडपाली परिसरातील नागरी समस्यांवर 30 जून रोजी महापालिकेवर धडकणार हजारो नागरिकांचा संतप्त मोर्चा

पनवेल : “पनवेल महानगरपालिका हद्दीत नागरिकांना पाणी आणि वीज यांसारख्या मूलभूत सोयीसुविधा मिळत नाहीयेत. महावितरणचा सावळा गोंधळ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच आता रोडपाली गावात निवासी भागात महापालिकेने डंपिंग ग्राउंड उभारण्याचा घाट घातला आहे. या अन्यायाविरोधात आता पनवेलची जनता शांत बसणार नाही,“ असा आक्रमक पवित्रा बहुजन चळवळीतील ज्येष्ठ नेते भाई जगदीश गायकवाड यांनी घेतला आहे. या सर्व प्रलंबित मागण्यांसाठी येत्या 30 जून 2026 रोजी पनवेल महानगरपालिकेवर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी आज पत्रकार परिषदेत केली. रविवार, 21 जून 2026 रोजी पनवेल येथील हॉटेल पीस पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत भाई जगदीश गायकवाड यांच्यासह काँग्रेसचे नेते सुदाम पाटील, मा.शिक्षण सभापती बेबीताई गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी जगदीश गायकवाड यांनी पनवेलमधील विविध नागरी समस्यांवरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोडपाली गावातील निवासी भागात पनवेल महानगरपालिकेकडून डंपिंग ग्राउंड प्रस्तावित आहे. यामुळे स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असून, या प्रकल्पाला जनतेचा तीव्र विरोध आहे. हा प्रकल्प तातडीने रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच पनवेल हद्दीत वारंवार होणारे वीज खंडित होण्याचे प्रमाण आणि महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सावळ्या गोंधळाला पायबंद घालण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे 'लाईट, पाणी नाहीच, आता या डंपिंग ग्राउंडचे करायचे काय?' असा संतप्त सवाल करत पनवेलमधील रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत समस्या सोडवण्यात महापालिका अपयशी ठरल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. यासंदर्भात पनवेल येथील प्रांत कार्यालय येथून पनवेल महानगरपालिकेवर 30 जून रोजी सकाळी 11 वाजता प्रशासनाच्या या मनमानी कारभाराचा जाब विचारण्यासाठी आणि नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी हजारो नागरिकांच्या संख्येने विराट मोर्चा काढण्यात येणार आहे.

टाईम्स स्पेशल

या मोर्चामध्ये पनवेल आणि रोडपाली परिसरातील सर्व नागरिकांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जगदीश गायकवाड यांनी केले आहे.“ पनवेल महानगरपालिकेचे प्रशासकीय अधिकारी हे मस्तवाल झाले असून ते कोणाला जुमानत नाही आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नावर त्यांच्याकडे कोणतेही उत्तर नसून फक्त टेंडर सिस्टीम याकडे त्यांचे लक्ष आहे. याचा विस्फोट येत्या 30 तारखेला महामोर्चाद्वारे झालेला दिसेल, असे काँग्रेस नेते सुदाम पाटील यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg