loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण कृषी विद्यापीठात चार नवीन वसतिगृहे; विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न मार्गी

दापोली : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या निवासाच्या समस्येवर मोठा दिलासा मिळणार असून विद्यापीठ परिसरात चार स्वतंत्र वसतिगृहे उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. तसेच उद्यानविद्या महाविद्यालयासाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत आणि अत्याधुनिक अतिथीगृह उभारण्यालाही मंजुरी मिळाल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन विकासाला नवी गती मिळणार आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या मान्यतेनंतर राज्य शासनाने या विकासकामांना अंतिम प्रशासकीय मंजुरी दिली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कृषी, उद्यानविद्या, वानिकी तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली स्वतंत्र वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक वसतिगृहासाठी सुमारे १४.४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या आणि उपलब्ध निवास सुविधांवरील ताण लक्षात घेऊन हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांच्या निवासाचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार असून त्यांना अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. उद्यानविद्या महाविद्यालयासाठी स्वतंत्र प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार असल्याने प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम आणि गतिमान होईल.

टाईम्स स्पेशल

याशिवाय विद्यापीठात अत्याधुनिक अतिथीगृह उभारण्यात येणार असून शेतकरी, संशोधक, कृषितज्ज्ञ आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांसाठी दर्जेदार निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे. या विकासकामांमुळे विद्यापीठातील प्रशिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यक्रमांना अधिक चालना मिळेल. शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम होण्यासोबतच स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीलाही प्रोत्साहन मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी ही मंजुरी महत्त्वाची ठरणार असल्याचे मत शिक्षण व कृषी क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg